मुंबई – महानिर्मिती कंपनीच्या चंद्रपूर आणि कोराडी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासह परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील संचांच्या उभारणीसाठी लागलेल्या वाढीव खर्चासह या तिनही प्रकल्पांच्या 23 हजार 111 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प
महानिर्मिती कंपनीच्या चंद्रपूर औष्णिक विद्युत विस्तारित प्रकल्पातील प्रत्येकी 500 मे.वॅ. क्षमतेच्या संच क्रमांक 8 आणि 9प्रकल्प उभारणीसाठी शासनाने यापूर्वी 5 हजार 500 कोटींच्या मूळ खर्चास मार्च 2008 मध्ये मान्यता दिली होती. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान या दोन्ही संचांच्या उभारणी खर्चात वाढ झाली असून यामध्ये पुरवठ्यातील तफावत, बाजार मूल्यांकनात होत असलेले बदल तसेच प्रकल्पाच्या कामासाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीच्या किंमतीसह निर्देशांकात झालेली वाढ यांचा समावेश आहे. सध्या प्रकल्प उभारणीचे काम प्रगतिपथावर असून या दोन्ही संच कार्यान्वित होत आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने सुधारित खर्च आणि वाढीव भागभांडवलाकरीता मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.
या संच उभारणीचा एकूण सुधारित खर्च सात हजार चार कोटी 42 लाख इतका झाला आहे. त्यामुळे जास्तीच्या एक हजार 504कोटी 42 लाख इतक्या अतिरिक्त रकमेपैकी ८० टक्के म्हणजे एक हजार 203 कोटी 54 लाख रूपये इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज रूपाने उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित २० टक्के म्हणजे 300 कोटी 88 लाख रुपये राज्य शासनाकडून भागभांडवलाच्या स्वरूपात उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
परळी औष्णिक विद्युत प्रकल्प
परळी औष्णिक विद्युत प्रकल्पातील जुन्या संचाच्या जागी 250 मे. वॅ. क्षमतेचा नवीन संच बसविण्यासाठी लागणाऱ्या 2081 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित अंदाजित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन परळी, भुसावळ आणि पारस (अकोला) येथील जुन्या झालेल्या संचांच्या जागी 250 मे.वॅ. क्षमतेच्या बदली संचांच्या उभारणीसाठी व भाग भांडवल उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मे-2009 मध्ये मान्यता दिली होती. त्यात परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ८ साठी 1375 कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चास देण्यात आलेली मान्यता समाविष्ट होती. मात्र त्यानंतरच्या कालावधीत विविध कारणांमुळे संच क्रमांक ८ च्या उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली. हा प्रकल्प नोव्हेंबर 2016 मध्ये कार्यान्वीत झाला. मात्र त्यासाठी लागणाऱ्या सुधारित अंदाजित खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार आज 2081 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली. या सुधारित अंदाज पत्रकानुसार लागणाऱ्या जास्तीच्या 706 कोटी 3 लाख इतक्या खर्चापैकी 565 कोटी चार लाख विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज रुपाने उपलब्ध करुन घेण्यास महानिर्मिती कंपनीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच 91 कोटी 60 लाख एवढी रक्कम शासनाकडून अतिरीक्त भाग भांडवलाच्या स्वरुपात महानिर्मिती कंपनीस देण्यासह उर्वरित 248 कोटी 30 लाख इतक्या रकमेपैकी 49 कोटी 66 लाख इतकी रक्कम अंतर्गत स्त्रोतातून उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कोराडी औष्णिक विद्युत केंद्र
महानिर्मिती कंपनीच्या कोराडी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील संच क्रमांक ८, ९ आणि १० च्या उभारणीसाठी लागलेल्या सुधारित अंदाजित खर्चासह २ हजार १४६ कोटी ५९ लाख रुपये वाढीव प्रकल्प खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. महानिर्मिती कंपनीकडून कोराडी औष्णिक विद्युत विस्तारित प्रकल्पातील प्रत्येकी 660 मे. वॅ. क्षमतेच्या संच क्रमांक 8, ९ आणि १० या तीन संचांसाठी शासनाने यापूर्वी ११ हजार ८८० कोटींच्या प्रकल्प खर्चास ऑक्टोबर – 2008 मध्ये मान्यता दिली होती. हा प्रकल्प पूर्ण होण्यास कंत्राटदारांमुळे विलंब झाला आहे. मात्र, राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन, पाठपुरावा करुन प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यात येत आहेत. संच क्रमांक ८ चे काम पूर्ण झाले आहे. संच क्रमांक ९ आणि १० वाणिज्यिक तत्त्वावर चालविण्यात येत असून त्यांची कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
वाढीव खर्चानुसार २ हजार १४६ कोटी ५९ लाख इतक्या अतिरिक्त रकमेपैकी ८० टक्के म्हणजे एक हजार ७१७ कोटी २७ लाख रुपये विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज रुपाने उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित २० टक्के म्हणजे 429कोटी 32 लाख रुपये राज्य शासनाकडून भागभांडवलाच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा सुधारित एकूण खर्च रुपये 14 हजार 26 कोटी 59 लाख इतका आहे.