Daring burglary again in Bhusawal : Compensation Of Three lakhs extended भुसावळ : शहरातील नाहाटा कॉलेज जवळील चंद्रमा प्लाझा येथील फ्लॅटमध्ये शनिवारी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेच्या सुमारास अज्ञात चौघांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील जवळपास पाच तोळे सोने व 70 हजारांची रोकड मिळून तीन लाखांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात चोर्या-घरफोड्या वाढल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बंद घराला केले जाते टार्गेट
शहरातील नाहाटा कॉलेजजवळील बर्हाटे शाळेच्या मागील चंद्रमा प्लाझा अपार्टमेंटच्या दुसर्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रेल्वेतील निवृत्त कर्मचारी केशव नेमाडे हे राहतात. ते शनिवारी सायंकाळी त्यांची नात रडत असल्याने तिला तिच्या घरी पोहचविण्यासाठी गेले असता चार चोरट्यांनी हीच संधी साधत बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कापून घरात आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी बेडरुमध्ये असलेल्या कपाटातील तिजोरीचे कुलूप तोडून त्यात ठेवलेले 70 हजार रुपये रोख, सुमारे 5 तोळ्याचे सोन्याचे दागिरे असा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. नातीला सोडून नेमाडे हे घरी येत असतांना त्यांच्या अपार्टमेटजवळून गाडीतून चारचाकी वाहनातून चोरटे पसार झाले. चोरट्यांनी घरात असलेल्या मद्याचा आस्वाद घेतला. याच बरोबर तेथील साबणाचे पाकिट व निरमा पावडर घेऊन पसार झाले. केशव नेमाडे हे गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत.
पोलिस अधिकार्यांची धाव
घटनास्थळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन वाघमारे, तुषार पाटील व कर्मचारी यांनी पहाणी करुन घटनेची माहिती घेतली. दरम्यान श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले.