चंद्रशेखर आझाद यांची नजर कैदेतून सुटका; भीमा-कोरेगावला जाणार

0

मुंबई – भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची नजर कैदेतून सुटका करण्यात आली आहे. आझाद यांना मालाड येथील हॉटेल मनाली येथे गेल्या तीन दिवसांपासून नजरकैदैत ठेवण्यात आले होते. मात्र, अनेक सामाजिक संघटनांकडून दबाव आल्यानंतर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. आता ते कोरेगाव भीमा येथे जाणार आहे.

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मालाडच्या हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जांबोरी मैदानावरील आझाद यांची शनिवारची सभा रद्द झाली आहे.

पोलिसांनी संघटनेचे मुंबई प्रमुख सुनील गायकवाड, मराठवाडा विभागप्रमुख बलराज दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख अ‍ॅड. सचिन पट्टेबहादूर, अ‍ॅड. अखिल शाक्य, प्रवीण बनसोडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली. आझाद यांना भेटण्यासाठी गेलेले विद्रोही कार्यकर्ते कॉ. सुबोध मोरे यांनाही पोलिसांनी अटक केली. कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी हॉटेल परिसरात जमावबंदी लागू करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. भीम आर्मीच्या मालाड, दादर, शिवाजी पार्क, घाटकोपर, समतानगर, दिंडोशी येथील कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.