चंद्रहारला पहिल्याच लढतीत पराभवाचा धक्का

0

पुणे । समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने 61 वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तिस-या दिवशी अनेक रंगतदार कुस्त्या झाल्या. यात महाराष्ट्र केसरी गटात अनेक मातब्बर मल्लांना पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. यात सर्वाधिक धक्कादायक निकाल होता, तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचा. हिंगोलीच्या गणेश जगतापने त्याला चितपट केले. अभिजित कटके, सागर बिराजदार यांनी विजयी सलामी दिली. स्पर्धेत गादी विभागात डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या सांगलीच्या चंद्रहार पाटीलची पहिल्या फेरीत हिंगोलीच्या गणेश जगतापशी लढत होती. या लढतीत चंद्रहार पाटीलचे पारडे जड मानले जात होते. त्यामुळे चंद्रहार पाटीलला या स्पधेर्तील प्रबळ दावेदारांपैकी एक मानले जात होते. चंद्रहारची कुस्ती पाहण्यासाठी मैदानावर कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. चंद्रहारची गणेश जगतापसोबत लढत होती. गणेश जगतापने पहिल्याच फेरीत दुहेरी पट काढला. यानंतर चंद्रहार पाटीलने फ्रंट साल्तो डाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही. यानंतर अवघ्या दीड मिनिटांत गणेशने चंद्रहारला चितपट केले.

बिराजदारची विक्रांतवर मात
लातूरच्या सागर बिराजदारसमोर पहिल्या फेरीत मुंबई पूर्वच्या विक्रांत जाधवचे आव्हान होते. यात सागर बिराजदारने विक्रांत जाधवला 4-0ने नमविले. पहिल्या फेरीत सुरुवातीला दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत खेळ केला. यानंतर सागर बिराजदारने एक गुण घेत आघाडी घेतली. दोन्ही मल्लांनी नकारार्थी कुस्ती करायला सुरुवात केली. मात्र, सागरने वेळीच सावरत आपले कौशल्य दाखवले. त्याने साल्तो डाव टाकला आणि गुणांची कमाई केली. सागरने विक्रांतला नंतर फारशी संधीच दिली नाही.

गणेशने कुस्ती आणि मनेही जिंकली
चंद्रहारसारख्या बड्या पेहलवानाला पहिल्याच फेरीत मात दिल्यावर कुठल्याही पेहलवानाने रिंगणातच विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली असती. पण गणेशने कुस्ती जिंकताच आनंद साजरा न करता थेट चंद्रहारच्या पाया पडून त्याच्याकडून आशीर्वाद घेतले. विजयी पेहलावन पराभूत पेहलवानाकडून आशिर्वाद घेतोय बघीतल्यावर ही लढत बघायला जमलेल्या कुस्तीप्रेमींनी गणेशच्या या कृतीला मनापासून दाद दिली. चंद्रहार हा डबल महाराष्ट्र केसरी आहे. त्याचे या खेळातील योगदान मोठे आहे असे ध्यानी ठेवून खेळ आणि वरिष्ठ खेळाडूचा मान राखण्यासाठी थेट आशिर्वाद घेतल्याचे गणेशने सांगितले. त्यामुळे गणेशने कुस्ती तर जिंकलीच त्याचबरोबर कुस्तीप्रेमींची मनेही जिंकल्याची भावना क्रीडानगरीत व्यक्त होत होती.

शिवराजला दुखापत
पुणे शहरच्या अभिजितची सलामीची लढत पुणे जिल्ह्याच्या शिवराज राक्षेविरुद्ध होती. दुखापतीमुळे शिवराजने ही लढत सोडली. त्या वेळी अभिजित 7-2ने आघाडीवर होता. अभिजित कटके याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली आणि 3 गुणांची कमाई केली. यानंतर शिवराजने दुहेरी पटाची पकड करुन 2 गुणांची कमाई केली. मध्यंतरानंतर अभिजितने आपला आक्रमक खेळ कायम राखला. पण शिवराजला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले.