चंबल सिक्युरीटीच्या कर्मचार्‍यांना दिलासा ; पी.फ.जमा होण्यास सुरवात

0

डॉ.नितु पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश ; ठेकेदाराचे दणाणले धाबे

भुसावळ- भोपाळमधील चंबल सिक्युरिटीचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसह सोयी-सुविधांपासून वंचित होते या संदर्भात भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ.नितु पाटील यांनी स्थानिक डीआरएम प्रशासनासह रेल्वे मंत्रालय व अन्य विभागांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पाठपुराव्यासंदर्भात ‘दैनिक जनशक्ती’ने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित ठेकेदाराचे धाबे दणाणले तर कर्मचार्‍यांचे पीएफ खाते उघडण्यास सुरुवात झाल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

खाजगी कर्मचार्‍यांचे शोषण
रेल्वे मेक्यानिकल विभागातर्फे रेल्वे कोच साफसफाईबाबत चंबल सिक्युरीटी सर्विसेसला ठेका देण्यात आला. फेब्रुवारी 2015 ते एप्रिल 2018 या काळात जवळपास 90 ते 120 कर्मचारी कामासाठी भरती करण्यात आले मात्र कर्मचार्‍यांना नियमानुसार पगार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे खाते तसेच इतर सुविधा देण्याविषयी बगल देण्यात आल्याने कर्मचार्‍यांनी एकसंघ होत रेल्वे प्रशासनाकडे डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार केली होती. डॉ.नितु पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे अस्थायी कामगार यांच्या वतीने मुख्य रेल्वे प्रबंधक, कार्मिक अधिकारी, रेल्वे मंत्रालय, लोक प्रतिनीधी, भविष्य निर्वाह निधी कार्यालय नाशिक, पुणे, मुंबई, आणि भोपाल या कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली. तक्रारीच्या रेट्यानंतर प्रशासन कामाला लागले तर भोपाळमधील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने तक्रारदार जितेश करोसिया या कर्मचार्‍यास मे पाठवला असून त्यात भविष्य निर्वाह निधी खाते उघडण्यात आल्याचे व एक वर्षांचा निधी वर्ग झाल्याचे कळवले आहे. इतर बाबींवर कायदेशीर कारवाई करण्याचे सोपस्कार सुरू असल्याचेही त्यात नमूद आहे. अन्य कर्मचार्‍यांचेदेखील लवकरच खाते उघडले जाणार आहे तर या कारवाईमुळे भुसावळ रेल्वे विभागातील इतर सर्व ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहे. त्यांनाही आता कर्मचार्‍यांचे सर्व अधिकार द्यावे लागणार आहे शिवाय या कर्मचार्‍यांसाठी आपण लढा देऊ, असे डॉ.पाटील म्हणाले.

कर्मचारी एकसंघतेचा विजय -डॉ.नितु पाटील
ज्या कर्मचार्‍यांनी प्रशासनाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांचा हा विजय आहे. काही महत्वपूर्ण कागद्पत्रे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय आणि राज्य कर्मचारी बिमा निगम कार्यालय यांच्याकडे पाठवली आहेत. कर्मचार्‍यांच्या या पिळवणुकीला जे रेल्वे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही तर रेल्वेतील मक्तेदार ज्या कर्मचार्‍यांचे शोषण करतील व त्यांना सुविधा देणार नाही त्यांच्याविरुद्ध यापुढे आवाज उठवू, असे डॉ.नितु पाटील म्हणाले.