चक्कर येऊन पडल्याने महाविद्यालयातच तरुणाचा मृत्यू : शिरपूरातील घटना

शिरपूर : कॉलेजमध्ये मित्रांसोबत आलेल्या विद्यार्थ्याचा अचानक चक्कर येवून जमिनीवर पडल्याने मृत्यू झाला. ही घटना आर.सी.पटेल पॉलिटेक्निक महाविद्यालयात घडली. जयेश पावजी धनगर (18, कुरखळी, ता.शिरपूर) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षात तो शिक्षण घेत होता. दरम्यान, बेशुद्धावस्थेत तरुणाला उपचारार्थ धुळे येथे हलवण्यात आल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली.

अचानक चक्कर आल्याने दुर्घटना
जयेश हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षात आर.सी.पटेल पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकत होता. नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गुरुवार, 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मित्रांसोबत जेवत असतांना अचानक चक्कर येऊन पडल्याने त्यास प्रा.नितीन बोरसे यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी अधिक उपचारासाठी धुळे येथे हलविले पण उपचारादरम्यान धुळे येथे जयेशचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती गावात मिळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तरुणाच्या मृत्यूने हळहळ
जयेशचे वडील पावजी धनगर हे आदर्श माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या पश्चात आई- वडील, व एक बहीण असा परीवार आहे. तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.