चक्क भाजप नगरसेवकाकडूनच आंदोलन

0

राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेवकांनीही ओतला होता कचरा

पिंपरी : प्रभागातील अनधिकृत फ्लेक्स जाहिरातींवर कारवाई करून काढून टाकण्याची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्याची वेळ भाजप नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर आली. त्यांनी विविध ठिकाणचे फ्लेक्स आणून मंगळवारी महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात ते फेकले. यापूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेविका पौर्णिमा सोनावणे आणि मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी अशाच पद्धतीने कचरा ओतला होता. त्यावेळी प्रशासनाने या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानेच अनधिकृत फ्लेक्स महापालिकेच्या दरवाजासमोर आणून टाकल्याने कारवाईचे कोणते पाऊल प्रशासन उचलणार? याबाबत उत्सुकता आहे.

सततची मागणी, तरीही दुर्लक्ष
कामठे म्हणाले, प्रभाग क्रमांक 26 पिंपळेनिलख, विशालनगर परिसरातील अनधिकृत फलक काढण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे करत आहे. गेल्या तीन महिन्यात याबाबत प्रशासनाला पाच निवेदने दिली आहेत. परंतु, त्याकडे आकाश चिन्ह परवाना विभाग व क्षेत्रिय अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्यात कसलाही समन्वय नाही. फलक काढावेत यासाठी यापूर्वी देखील ’ड’ क्षेत्रिय कार्यालयात आंदोलन केले होते. तरीही, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे मी स्वत: अनधिकृत फलक काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रभागातीलच नव्हे तर शहरातील अनधिकृत फलक हटविले जाणार आहेत. सोमवारी दिवसभर विशालनगर परिसरातील 400 अनधिकृत फलक काढले आहेत. कामचुकार अधिकारी ऐकत नाहीत. प्रशासनाने सर्वंच फलकांवर कारवाई करावी. राजकीय फलक असले तरी त्यावर कारवाई करावी, कोणाचाही मुलाहिजा ठेवू नये, असेही ते म्हणाले.