धुळे । वारंवार पाठपुरावा करूनही शासन चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत दखल घेत नसल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांनी आजपासून दोन दिवस संप पुकारला आहे. त्यांनी शहरातील कल्याण भवनजवळ आंदोलन केले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे १८ सप्टेंबर पासून बेमूदत संपावर जाण्याचा निर्धार केला होता. परंतू सणासुदीचे दिवस लक्षात घेवून व सरकार चर्चेस तयार होईल या उद्देशाने हा नियोजित संप स्थगित करून २१ व २२ सप्टेंबर दरम्यान दोन दिवस हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाची दखल न घेतल्यास २७ सप्टेंबर पासून बेमूदत संप करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष वाल्मीक चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन कापसे, एस.यु. तायडे, संजय काकुळदे, बबन वाघ, नंदलाल गायकवाड, चैत्राम सासके, सुरेश बिसनारीया, वाल्मीक कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.