मुंबई । अँटी नार्कोटिक्स विभागाच्या धडक कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. पोलिसांच्या भीतीपोटी मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा आणण्याचे थांबवून तस्करांनी अमली पदार्थात भेसळ करण्यास सुरुवात केली आहे. छोट्या प्रमाणात ड्रग्ज आणून त्यात हुबेहूब दिसणारे पदार्थ मिक्स करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरात भेसळयुक्त अमली पदार्थांचा बाजार सुसाट असून नशेबाजांना नकली नशेचा डोस मिळू लागला आहे.
गेल्या काही दिवसांत अँटी नार्कोटिक्स विभागाने मोठमोठ्या ड्रग पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात चरस, गांजा आणणार्या काश्मिरी ड्रग्ज माफियांनाही गजाआड करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांनीसुद्धा ड्रग्जविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. यामुळे मुंबईत एमडी, गांजा, चरस, कोकेनचा मोठ्या प्रमाणात साठा येण्याचे प्रमाण घटले आहे. ड्रग्ज तस्करांनी पोलिसांचा ससेमिरा वाचवण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे. कमी प्रमाणात ड्रग्जचा साठा अगदी छुप्या पद्धतीने आणायचा आणि त्यात भेसळ करून ड्रग्जचे प्रमाण दुप्पट करायचे, असे काम सध्या जोरात सुरू आहे, अशा प्रकारे नशेबाजांना गंडा घालून ड्रग्ज तस्कर लाखोंची कमाई करत आहेत.
केटामाइनसारख्या अमली पदार्थांची निर्मिती
पोलिसांच्या कारवाईमुळे बाजारात माल येतच नाही. कसेबसे करून थोड्या प्रमाणात माल पेडलर आणत आहेत. बाजारात माल कमी आहे, अशी बतावणी करून पेडलर्स भेसळयुक्त एमडी, गांजा, चरस आणि कोकेन नशेबाजांना नेहमीपेक्षा जास्त किंमतीत विकत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. नुकतेच गोवा, वडोदरा आणि महाराष्ट्रातील रायगड परिसरात डीआरआयकडून करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान केटामाइनसारख्या अमली पदार्थांची निर्मिती केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सध्या अमली पदार्थांमध्येसुद्धा आता भेसळ अधिक आणि नशा कमी, असा प्रकार सुरू असल्याची माहिती माजी वरिष्ठ आयपीएस अधिकारी पी. के. जैन यांनी दिली आहे.
कशात कसली भेसळ?
एमडी – पॅरासिटामोल,
तुरटीचा भुगा, अजिनोमोटो
चरस – सुकलेले शेण, बुट पॉलिश
गांजा – सुकलेले गवत
कोकेन – अजिनोमोटो
कुठे मिळतो माल?
चरस – गुजरात
एमडी – मुंब्रा, कळवा
गांजा – कल्याण, उल्हासनगर