चर्‍होली, रावेतच्या गृहप्रकल्पांस 220 कोटींचा खर्च

0

प्रधानमंत्री आवास योजना : महापालिका साडेनऊ हजार सदनिका बांधणार

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागातील 10 ठिकाणी नऊ हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. चर्‍होली येथे 1 हजार 442 सदनिका बांधण्यासाठी 132 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तर, रावेत येथील 934 सदनिका बांधण्यासाठी 88 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हे प्रस्ताव बुधवारी (दि.28) होणार्‍या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवले आहेत.

ठेकेदार संस्था दर कमी करून देणार
महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत. शहराच्या विविध भागात 10 ठिकाणी नऊ हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. त्यानुसार चर्‍होली येथे 1442, रावेतमध्ये 934, डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, मोशी – बोर्‍हाडेवाडीमध्ये 1400, वडमुखवाडीत 1400, चिखलीमध्ये 1400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीमध्ये 500 सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे. चर्‍होली, रावेत आणि मोशीतील बोर्‍हाडेवाडीमध्ये बांधण्यात येणार्‍या गृहप्रकल्पाच्या ’डीपीआर’ला केंद्र आणि राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत चर्‍होली येथे बांधण्यात येणार्‍या एक हजार 442 सदनिकांसाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. मे. मन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लि कंपनीच्या ठेकेदाराने 145 कोटी 62 लाख रुपयांची निविदा भरली होती. या कामाची निविदा 122 कोटी 32 लाख रुपये असून, ही निविदा रकमेपक्षा 23 कोटी रुपयांनी अधिकची होती. हा दर कमी करुन देण्यासाठी पालिकेने 12 फेब्रुवारी 2018 रोजी ठेकेदाराला पत्र पाठविले होते. त्यानंतर मे. मन. इन्फ्रा कन्स्ट्रक्शन यांनी हे काम 132 कोटी 50 लाख रुपयात करुन देण्यास तयार असल्याचे पत्र पालिकेला 22 फेब्रुवारी 2018 रोजी पाठविले.

प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवणार
राज्य सरकारच्या दरसूचीनुसार आणि जीएसटीशिवाय कामाची किंमत 113 कोटी 48 लाख इतकी होत आहे. टेस्टींग चार्जेस, आरसीसी डिझाईन चार्जेस यासह एकूण किंमत 115 कोटी 79 लाख होत आहे. जीएसटी 12 टक्के, सिमेंट व स्टील यातील फरक आणि राॅयल्टी चार्जेसह कामाची निविदा स्वीकृती दर 130 कोटी नऊ लाख रुपये येत आहे. ठेकेदाराने पत्राद्वारे कळविलेल्या कामाची किंमत 132 कोटी 50 ही निविदा 130 कोटी नऊ लाख पेक्षा दोन कोटी 40 लाख जादा म्हणजेच निविदा स्वीकृतीपेक्षा 4.84 टक्के जादा आहे. ठेकेदाराने 22 फेब्रुवारी रोजी कळविलेल्या सुधारीत किंमत 132 कोटी 50 लाख रुपयांची निविदा स्वीकारण्यात आली असून हा प्रस्ताव स्थायी समोर मान्यतेसाठी ठेवला आहे. रावेत येथे बांधण्यात येणार्‍या 934 सदनिकांसाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. मे.मन. इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लि कंपनीच्या ठेकेदाराने 100 कोटी 91 लाख रुपयांची निविदा भरली. ही निविदा रक्कम 79 कोटी 45 लाख या रकमेपेक्षा 21 कोटी रुपयांनी अधिक होती. हा दर कमी करुन देण्याबाबत पालिकेने ठेकेदाराला पत्र पाठविले. ठेकेदाराने हे काम 88 कोटी 25 लाख रुपयांमध्ये करुन देण्यास तयार असल्याचे 22 फेब्रुवारी रोजी पालिकेला पत्राद्वारे कळविले. या ठेकेदाराला हे काम 88 कोटी 25 लाख रुपयांत देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.28) होणार्‍या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.