राजेंद्र पंढरपुरे
पुणे : राज्यसभेचे सदस्य संजय काकडे यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली आणि या भेटीचे पडसाद पुण्याच्या काँग्रेस पक्षात उमटू लागले आहेत. लोकसभेसाठी काकडे उमेदवार असतील का ?या प्रश्नाभोवती सारी चर्चा केंद्रीत झाली आहे.
काँग्रेस भवनात बुधवारी पक्षाची बैठक होणार होती. या बैठकीत काकडे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला रोखण्याचे प्रयत्न होतील, किंबहुना त्याप्रमाणे डावपेच शिजलेत अशी कुणकूण लागताच ही बैठकच रद्द करण्याच्या सूचना प्रदेशातील नेत्यांकडून आल्या आणि बैठक रद्द ही झाली. मात्र, या घडामोडींमुळे काँग्रेसचे उमेदवार काकडेच असतील का ? वरिष्ठ पातळीवर तसा काही शब्द दिला गेला का ?या चर्चेला उधाण आले आहे. पक्षात आता बाहेरचा उमेदवार नको असा ठराव नुकताच पुणे शहर काँग्रेस पक्षाने संमत केला होता. ठरावाचा रोख काकडे यांच्या दिशेनेच होता.
संजय काकडे अपक्ष राज्यसभा सदस्य आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसकडे झुकले होते. त्यानंतर म्हणजे पुणे महापालिका निवडणुकीदरम्यान सन२०१७मध्ये ते भाजपमध्ये सक्रीय झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये अनेकांना आणले. भाजपनेही त्यातील काहींना उमेदवारी दिली, भाजपच्या प्रचार पत्रकांवर काकडेंचे फोटो झळकवले. भाजपला बहुमत मिळाले त्याचे काही श्रेय काकडे यांना देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काकडे यांचे चांगले संबंध राहीलेत. गेल्या काही महिन्यात मात्र भाजपच्या कार्यक्रमात काकडे दिसेना झाले. पुणे महापालिकेच्या कारभाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपकडूनही त्यांना निमंत्रणे जाईनात.भाजपपासून ते दुरावले तरी मुख्यमंत्री त्यांना थांबवतील ? असे म्हटले जाते, त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या काकडे यांनी भेटी घेतल्या. त्यातून पुण्यात राजकीय वर्तुळात काकडे हे केंद्रबिंदू झाले आहेत.
काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वर्षभरात अनौपचारिकपणे पुण्यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्याशी बोलून उमेदवारीबाबत चाचपणी केली आहे. पुण्याच्या काँग्रेस कमिटीने मोहन जोशी, अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, अनंत गाडगीळ आणि अरविंद शिंदे अशी पांच नांवे सुचविली आहेत. काँग्रेस पक्षाने मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले असून सोनल पटेल या सहप्रभारी असून पुण्यातील संघटनेत त्या लक्ष घालीत आहेत.