शरद पवार यांचेही मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
मुख्यमंत्री कार्यालयात कोट्यवधी रूपयांचा चहा घोटाळा
पुणे : मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याचे वादळ शांत झालेले नसतानाच मुख्यमंत्री सचिवालयातील चहा घोटाळा उघड झाला आहे. त्यावरून भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मीही राज्याचा चारवेळा मुख्यमंत्री होतो. मात्र हा खर्च ऐकून आश्चर्य वाटले, चहापानाला इतका खर्च येतो हे जाणवले नाही, असे खोचक वक्तव्य पवारांनी केले. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.
निरूपम यांनी उघडकीस आणला होता घोटाळा
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहितीच्या अधिकाराखाली मुख्यमंत्री सचिवालयातील चहा घोटाळा उघडकीस आणला आहे. याबद्दल अधिक माहिती देताना खा. निरुपम म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा कोणत्या प्रकारचा चहा पितात किंवा पाहुण्यांना पाजतात, त्यात असे काय टाकले जाते तेच कळत नाही. आजच्या काळात आपण ग्रीन टी, लेमन टी, हर्बल टी अशा वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे प्रकार ऐकले आहेत. परंतु, देवेंद्र फडणवीस कदाचित सोन्याचा चहा पित असणार किंवा इतरांना पाजत असतील, अशी टीकाही त्यांनी केली होती.
रोज 18,500 कप चहा
माहितीच्या अधिकाराच्या पत्रकात असे दिसून येत आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात चहापाणावर होणार्या खर्चामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. 2015-16 मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात 58 लाख रुपये चहावर खर्च झाले. तर 2017-18 मध्ये हा खर्च वाढून 3.4 कोटी इतका झाला. चहा-पाण्याच्या खर्चामध्ये तब्बल 577 टक्के वाढ झाली. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात रोज 18,500 कप चहा प्यायला जातो. ही बाब पचवायला जरा अवघडच आहे. एकीकडे रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे चहाच्या खर्चात 577 टक्के इतकी वाढ केली जाते. हा खूप मोठा घोटाळा आहे. भाजप सरकार हे घोटाळ्याचे सरकार आहे, असे खा. निरूपम यांनी म्हटले होते. दरम्यान, याच चहा घोटाळ्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर पुण्यात निशाणा साधला.