जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापाठातील कंत्राटी प्राध्यापकांना कायम सेवेत घेण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांना सोमवार 8 मे रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. विद्यापीठात अनेक विभागात कंत्राटी प्राध्यापक गेल्या तीन ते चार वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना अकरा महिन्यांच्या करारावर कामावर ठेवण्यात येते. अकरामहिन्यानंतर पुन्हा जाहिरात काढून नियुक्ती केली जाते. यातील अनेक प्राध्यापक कालावधी संपल्यानंतर काम सोडून जातात. मात्र, अनेक कंत्राटी प्राध्यपकांची जाहिरात न काढता नियुक्ती केली जाते. तसेच कंत्राटी प्राध्यापक यांचे कामाचे स्वरुप एक सारखे असून त्यांना मिळणारे वेतन हे वेगळे वेगळे आहेत हा एक प्रकारे अन्याय आहे. विद्यापिठाच्या सोशन सायन्स व सायन्स विभागामधील काही प्राध्यापक सलग कंत्राटी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. असा भेदभाव अपेक्षीत नाही. तसेच कंत्राटी प्राध्यापक नॉन टिचींगचे सर्व कामे करतात असे निवेदनात म्हटले आहे.
कंत्राटी प्राध्यापकांमुळे शैक्षणिक दर्जा खालवला
वारंवार कंत्राटी प्राध्यापक बदलल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो अशी भूमिका मनसेने घेतली आहे. अकरा महिन्याचा करार असल्यामुळे कंत्राटी प्राध्यापकवर टांगती तलवार असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो. अनेक महत्वाचे विभाग कंत्राटी प्राध्यापकांची सेवा घेवून चालवली जात आहेत. यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जावर परिणाम होतो. वारंवार जाहिरात काढल्यामुळे विद्यापीठाचा अवास्तव खर्च होतो आहे. याबाबत विद्यार्थी हित व शैक्षणिक दर्जाचा सारासार विचार करून जे कंत्राटी प्राध्यापक गेल्या तीन चार वर्षापासून चांगली सेवा देत आहेत, त्यांना कायम सेवेत घ्यावे, अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत. कंत्राटी प्राध्यापक द्विधा स्थितीत काम करीत असल्यामुळे कुलगुरु यांनी योग्य तो न्याय द्यावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विद्यार्थी शिक्षण हिताकरीता कंत्राटी प्राध्यापकांचा लढा उभारेल त्याकरीता विद्यापीठाने सहानुभूतीने विचार करून त्यांना न्याय द्यावा. दरम्यान, कुलगुरु यांच्याशी चर्चा झाली, त्यावेळी कंत्राटी प्राध्यापकांच्या विषयी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे, अशी माहिती कुलगुरु श्री.पाटील यांनी दिली.