पुणे । हजार शब्दांचे काम एका छायाचित्राच्या माध्यमातून होते, असे म्हटले जाते. ते खरंही आहे. पण त्याही पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की, एका चांगल्या छायाचित्रात ‘डिसिजन मेकर’ होण्याची ताकद असते, असे मत सुप्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार गणेश शंकर यांनी व्यक्त केले. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माधव चंद्रचूड, संदीप देसाई, शैलजा देशपांडे, अविनाश मंजुळ उपस्थित होते. महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. त्यात पुण्याचे शशांक गांधी, बदलापूरचे मंदार घुमरे, नाशिकचे डॉ. आनंद बोरा यांना अनुक्रमे पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
शंकर म्हणाले की, निसर्ग आपल्याला आनंद देतो. मानसिक शांतता देतो. निसर्गाचं चित्रण करताना स्वतःचा आनंदही त्यातून शोधता आला पाहिजे. पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. पर्यावरणाचे वास्तव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात छायाचित्र महत्त्वाची भूमिका बजावू शकते. निसर्ग छायाचित्रण करणार्यांनी ही बाजूही लक्षात घेतली पाहिजे.देशातील बहुतेक शहरांमधल्या छायाचित्रकारांनी या स्पर्धेसाठी आपली छायाचित्रे पाठवली होती. निसर्गाकडे छायाचित्रकार कशा पद्धतीने पाहतो, हे या छायाचित्रांमधून प्रामुख्याने दिसून आले, असे मंजूळ यांनी सांगितले. हे प्रदर्शन 8 जानेवारीपर्यंत खुले राहणार आहे. स्पर्धेतील दोन उत्तेजनार्थ पारितोषिके भेट देणार्या प्रेक्षकांनी दिलेल्या मतदानातून निवडण्यात येणार असल्याचे चंद्रचूड यांनी सांगितले. कार्यक्रमात गणेश शंकर यांचा ‘नेचर फोटोग्राफी द जर्नी सो फार’ या विषयावर सदीप व्याख्यान झाले. त्यातून त्यांनी स्वतःच्या छायाचित्रकाराचा प्रवास उलगडवून दाखविला. निवेदन सुप्रिया चित्राव यांनी केले.