पुणे : चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी दुसर्या टप्प्यात तब्बल 130 कोटी 69 लाखांचा खर्च येणार आहे. यापूर्वी बांधीव मिळकतींच्या भूसंपादनासाठी महापालिकेने सुमारे 86 कोटी रुपयांचे भूसंपादन केलेले आहे. दरम्यान, दुसर्या टप्प्यातील या भूसंपादनाच्या निधीसाठी पुढील आठवड्यात होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली.
महापालिकेकडून या पुलासाठी सुमारे 28 हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. आता दुसर्या टप्प्यात 10.60 हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले असून त्यात सुमारे 79 जागामालकांचा समावेश आहे. यातील सुमारे 5.57 हेक्टरच्या जागा मालकांना रोख स्वरूपात 130 कोटींचा निधी दिला जाणार आहे. तर उर्वरीत 5.4 हेक्टरच्या जागा मालकांना ‘टीडीआर’ आणि ‘एफएसआय’च्या माध्यमातून मोबदला दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. ही रक्कम देण्यासाठी स्थायी समितीकडून मान्य करून घेण्यात येणार असून जागा मालकांच्या प्रत्यक्ष कागदपत्रांची अंतिम छाननी झाल्यानंतरच ही रक्कम दिली जाणार आहे.
शासनाकडून 37 कोटींचा निधी
या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी राज्यशासनाकडून महापालिकेस 185 कोटींचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या हप्त्यात पालिकेस 37 कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. भूसंपादनासाठी येणारा खर्च आधी महापालिकेने करायचा असून त्याची माहिती शासनास सादर करायची आहे. त्यानंतर शासनाकडून पालिकेस तीन टप्प्यांत ही रक्कम वितरीत केली जाणार आहे. त्यामुळे तुर्तास महापालिकेस पदरमोड करूनच ही रक्कम भरावी लागत असल्याचे चित्र आहे.