चांदणी चौक उड्डाणपुलाबाबत अहवाल देणार

0

वारजे । चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाचा काही भाग एनडीएच्या रस्त्याला जोडणारा असल्याने या कामासाठी पालिकेला लष्कराची नक्की किती जागा लागणार आहे, याची सविस्तर माहिती एनडीएने महापालिकेकडे मागितली आहे. ही माहिती तयार करून त्याचा सविस्तर अहवाल पाठविण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चांदणी चौकातील वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी उड्डाणपुलाचा प्रस्ताव ठेवला आहे. हा पूल बांधवन, कोथरूड, पौड रस्ता, एनडीए रस्त्याला जोडणार असून रस्तात काही प्रमाणात एनडीची जागा जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने लष्कराच्या मालमत्ता विभागास पत्र पाठविले होते. त्यास अनुसरून विभागाने पालिकेस नेमकी किती जागा जाणार आहे, यासाठी सविस्तर प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. ही जागा एनडीएची असल्याने संबंधित विभागाचे ना हरकत प्रत्र घेणे जरुरीचे आहे. तसेच केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाची परवानगी देखील घेणे अत्यंत गरजेचे असल्याने याचा सविस्तर अहवाल त्वरीत सादर करण्यासाठी पालिकेला कळविले आहे. सध्या हा अहवाल तयार करण्याचे काम पालिका करीत असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

चांदणी चौकात बहुमजली पुलाचे नुकतेच भूमीपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. हे काम थोड्याच दिवसांत सुरू होणार असल्याने तत्पूर्वी पोलिसांनी वाहतूक नियोजन करणे अत्यंत आवश्यक असल्याने त्याची प्रशासनाने त्वरीत नोंद घ्यावी. अशी मागणी छावा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ पवार यांनी केली आहे.