पुणे : शहरातील चांदणी चौक हा मृत्युचा सापळा बनला असून, या चौकातील उड्डाणपुलाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नुकतेच भरधाव डंपरने चिरडल्याने आयटी अभियंता असलेल्या 19 वर्षीय युवतीसह दहा वर्षीय बालिकेचा येथे बळी गेला होता. तर गेल्या पाच वर्षात तब्बल 72 गंभीर अपघात या भागात झाले असून, त्यात 37 बळी गेले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ने तातडीने येथे उड्डाणपूल उभारण्याची कारवाई सुरु करायला हवी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे. शहरात जे 25 अपघातप्रवण स्थळे घोषित करण्यात आलेली आहेत, त्यात चांदणी चौकाचाही समावेश आहे. त्यामुळे महापालिका व प्राधिकरणाला या ठिकाणी आणखी किती बळी हवेत? असा प्रश्न पुणेकर विचारीत आहेत.
मल्टी-लेव्हल उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार
पुणे शहरात तब्बल 25 अपघातप्रवण स्थळे आहेत. त्यातील चांदणी चौक हा अत्यंत गंभीर असा मुद्दा बनलेला आहे. या चौकातून जाणार्या महामार्गावरून दिवसाकाठी सरासरी 1.60 लाख वाहने जा-ये करतात. तर गेल्या पाच वर्षात या चौकात 37 बळी येथे गेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 4 वरील हा महत्वाचा एण्ट्री पॉइंट असून, वाहतूक कोंडीची समस्याही मोठी आहे. त्यामुळे पुणे महापालिका व महामार्ग प्राधिकरणाने येथे मल्टी-लेव्हल उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केलेला आहे. तसेच, या पुलाचे काम पुणे महापालिकेनेच करावे, असेही उच्चाधिकार पातळीवर निश्चित झालेले होते. तरीही येथील उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरु झालेले नाही. हा पूल राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने पुलाचा खर्च केंद्र सरकार करेल, असे यापूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते. त्यानुसार 421 कोटींचा निधी देण्याची तयारीही सरकारने दाखवलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबवली होती. तसेच, पुणे महापालिकेला भूसंपादनासाठी सूचनाही देण्यात आली होती. तरीही उड्डाणापुलाचे घोंगडे भिजत पडलेले आहे.
महापालिकेकडून भूसंपादन रखडले!
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे महापालिकेला उड्डाणपुलासाठी भूसंपादन करण्याचे निर्देश देऊनही महापालिकेने अद्यापही भूसंपादन केले नाही. एवढेच नव्हे तर अद्याप भूसंपादनासाठी सर्वेक्षणही केले नसल्याची बाब प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी निदर्शनास आणून दिली. कोथरुडच्या आमदार मेधाताई कुलकर्णी यांनीही या चौकातील उड्डाणपुलासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे तातडीने संयुक्त बैठक घेण्याबाबत मागणी केली होती. परंतु, महापालिकेने अशी बैठक बोलावलेली नाही. उड्डाणपुल तातडीने होण्यासाठी महापालिकेची भूमिका महत्वाची असून, चौकातील भूमालकांची यादी तयार करणे, सर्वेक्षण करणे आदी कामे हातावेगळी करावी लागणार आहेत. तसेच, भूसंपादनाची प्रक्रियाही वेगाने पूर्ण करावी लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 421 कोटींचे टेंडर काढलेले आहे. परंतु, महापालिकेने उड्डाणपुलासाठी भूसंपादनच केलेले नाही. चौकात केवळ खासगी जागाच नाही तर संरक्षण खाते, वनखाते यांचीही जागा आहे, ते संपादन करण्याची प्रक्रिया तातडीने करावी लागणार आहे. त्यासाठी सर्वांची संयुक्त बैठक बोलवावी लागणार आहे. तसेच, पुलाचे काम सुरु झाले तर दोन वर्षे चांदणी चौकातील वाहतूक वळवावी लागणार आहे, त्याचेही नियोजन व्हायला हवे. यापूर्वी काढलेल्या निविदेचा कार्यकाळ वाढवून दिलेला आहे.
– मेधाताई कुलकर्णी, आमदार कोथरुड
चांदणी चौकातील उड्डाणपुलाबाबत वस्तुस्थिती
421 कोटी : उड्डाणपुलासाठी एकूण खर्च अपेक्षित
12 हेक्टर : पुलासाठी जागणारी जागा
42 महिने : पूल पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी