चाकणमध्ये एड्स जनजागृतीपर मेगा रॅली उत्साहत 

0
महिंद्रा, यश फाऊंडेशनने राबविला उपक्रम
चाकण : महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स तसेच यश फाऊंडेशनच्यावतीने आरोग्याचा अधिकार, माझे आरोग्य-माझा अधिकार या थीम ला अनुसरून 1 ते 7 डिसेंबर या सप्ताहांतर्गत एच.आय.व्ही./एड्स निर्मुलन जनजागृतीसाठी मेगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
चाकण व खेड तालुक्यातील विविध शाळा तसेच महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक या मेगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यश फाऊंडेशन 2018 पासून तालुक्यात एच.आय.व्ही./एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत पुनर्वसन अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात असतात. तसेच जनजागृती म्हणून वर्षभर शाळा, महाविद्यालय, वस्ती, गाव, औद्योगिक वसाहत, कंपनीमध्ये प्रतिबंधात्मक जनजागृती केली जात असते. संस्थेच्यावतीने दरवर्षी विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून समाजातील एच.आय.व्ही. बाबतचे गैरसमज, भीती, अज्ञान, भेदभाव, कलंक  दूर करण्याचा प्रयत्न तसेच प्रतिबंधात्मक काळजी विषयी मार्गदर्शन केले जात असते .
या शाळांनी काढली रॅली
यामध्ये तालुक्यातील शिवाजी विद्यामंदिर, कला वाणिज्य महाविद्यालय, चाकण न्यू इंग्लिश स्कूल, नवचैतन्य जु.कॉलेज, सुभाष माद्य. व उच्च माद्य. विद्यालय बहुळ, भानोबा विद्यालय कोयाळी, शरदचंद्र विद्यालय वडगाव, इंदिराजी विद्यालय मोई, भैरवनाथ विद्यालय, कुरुळी, समर्थ विद्यालय खराबवाडी, कन्या विद्यालय मुटकेवाडी, श्रीपती बाबामहाराज विद्यालय म्हाळूंगे, भैरवनाथ विद्यालय दोंदे, श्री रेणुका माध्यमिक विद्यालय, मॉर्डन हायस्कूल भोसे, शिवाजी विद्यालय शेल पिंपळगाव आदी विविध शाळा, महाविद्यालय यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या रॅलीचे उद्घाटन उपस्थित प्राचार्य, शिक्षक, महिंद्रा कंपनीचे व यश फाऊंडेशन अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ यांच्या हस्ते हवेत फुगे उडवून करण्यात आले. हिरवा झेंडा दाखवून रॅली मार्गस्थ करण्यात आली.
30,000हून अधिकांचा सहभाग
प्रभातफेरी महाविद्यालय/शाळेच्या आवारातून ग्रामपंचायत मार्गे, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, वस्ती मार्गे गावातून परत शाळेच्या आवारात येऊन मुलांना खाऊ व पाणी वाटप करून व एच.आय.व्ही./एड्स विषयी माहिती देऊन समारोप करण्यात आला. यावेळी प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, एच.आय.व्ही.चे शिक्षण करी जीवनाचे रक्षण, एड्स कळे संकट टळे, जवान हु नादान नही, एच.आय.व्ही.चे ज्ञान वाची प्राण, संयम पाळा-एड्स टाळा या सारख्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. यामध्ये विविध फलक, घोषवाक्य, माहिती पत्रक  यांचा उपयोग करण्यात आला. प्रभातफेरीत सुमारे 30,000हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ तसेच महिंद्रा कंपनी व यश फाऊंडेनचे अधिकारी व स्वयंसेवक सहभागी झाले होते.