सर्वच ठाण्यांमध्ये राबविणार हा उपक्रम
चाकणः चाकण पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचार्यांनी शुक्रवारी ‘रन फॉर हेल्थ’ उपक्रमामध्ये सहभाग घेतला. भल्या सकाळी एकमेकांना प्रोत्साहित करीत चाकण-आळंदी घाट रस्त्यावर सुमारे आठ किमी अंतर पोलिसांनी धावून पूर्ण केले. कर्तव्य बजावताना पोलिसांचे स्वतःच्या आरोग्याकडे अजाणतेपणाने दुर्लक्ष होते आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये राबविण्यात येत आहे. चाकण पोलिसांच्या या उपक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनाच आपल्या क्षमतेबद्दल साशंकता वाटत होती. मात्र अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी मोठ्या हिंमतीने हे अंतर पूर्ण केले. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहायक निरीक्षक प्रशांत पवार यांच्यासह सुमारे पन्नास पोलीस कर्मचारी यात सहभागी झाले होते.