चाकण-देशमुखवाडी एसटी बससेवा बंद

0

चाकण : खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्याच्या दुर्गम डोंगरी भागात सुरू असलेली चाकण ते देशमुखवाडी या मार्गावर एसटी बस सुरू करून महिन्यातच अचानक बंद केल्याने प्रवासी नागरिकांसह विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. देशमुखवाडी हे गाव तालुक्याच्या दुर्गम डोंगरी पश्चिम भागात असून चाकणपासून जवळपास 35 किमी अंतरावर आहे.

या गावासाठी स्वतंत्र एसटी बस सुरू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची होती.या  गावातून चाकण ते गडद, वांद्रा अशा एसटी बस सुरू आहेत परंतु देशमुखवाडी गावासाठी स्वतंत्र बस नव्हती त्यामुळे गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रवास करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. या सर्व बाबींचा विचार करून गावचे सरपंच रामदास भोईर यांनी चाकण ते देशमुखवाडी एसटी बस सुरू करण्याची लेखी पत्राद्वारे मागणी राजगुरूनगर एसटी बस आगार प्रमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार ही बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र वाहकाकडून खोडसाळपणे एसटी बस थांब्यावर न थांबवणे, वेळेआधीच गाडी घेऊन जाणे अशा घटना घडवून, सदर एसटी बसच्या फेर्‍या तोट्यात असल्याचे सांगितल्यानेच ही बस सेवा बंद करण्यात आल्याचे देशमुखवाडीच्या सरपंचांची सांगितले आहे.