वाहतूक कोंडीसाठी नगरपरिषदेतर्फे उपाययोजना
अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविणार
चाकण : चाकण नगरपरिषद हद्दीत वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा ठरणार्या भागाची नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि पदाधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. वाहतुकीला अडथळा ठरणारी अनधिकृत अतिक्रमणे काढण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. अनेकदा बंद सिग्नल यंत्रणा, बेशिस्त वाहनचालक, प्रवाशी वाहतुकीच्या वाहनांचे भर रस्त्यातील अनधिकृत वाहनतळ व अतिक्रमणांचा विळखा यामुळे चाकण भागात वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याचा आरोप होत आहे.
औद्योगिकीकरणामुळे रहदारी वाढली
औद्योगिकरणामुळे वाढलेली रहदारी, मार्केटयार्ड आणि परिसरातील गावांची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या चाकणमध्ये औद्योगिक सुटी आणि आठवडे बाजाराच्या दिवशी कायमच नागरिकांची गर्दी असते. त्यामध्ये शनिवार व बुधवार हे बाजाराचे दिवस आणि रविवार व गुरुवार या औद्योगिक सुट्यांच्या दिवशी जास्तच भर पडते. त्यातच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान नुकतेच झाले. वारकरी आणि भावकांची रस्त्यावरील वर्दळ वाढली होती. त्यावेळी आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता. येथील महामार्ग तीन ते चार किमीपर्यंत जाम होऊ लागले आहेत. चाकण परिसरातील अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अ
तिक्रमणे, वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहनचालक यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असतो.
गुरूवारी केली पाहणी
प्रवासी रिक्षा, पीएमपीएमएल बस, कामगार वाहतुकीच्या खाजगी बसेस रस्त्यातच थांबविल्या जातात. तसेच शहरातील सेवा रस्त्यावरून महामार्गावरील वाहने पुढे जाण्याचा सर्रास प्रयत्न करीत असल्याने अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीलम पाटील, नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, गटनेते किशोर शेवकरी, नगरसेवक ऋषिकेश झगडे, धीरज मुटके, सागर बनकर, सामाजिक कार्यकर्ते समीर सिकीलकर यांच्यासह सर्वनगरसेवक आणि नगर परिषद प्रशासनाच्या अधिका-यांनी गुरुवारी सायंकाळी पुणे-नाशिक महामार्गाची पाहणी करून वाहतुकीस अडथळा ठरणारी वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहणी करून जाणून घेतली. नगरपरिषदेतील हद्दीतील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे वाहतूक सुरुळीत
चालावी यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष घोगरे व उपनगराध्यक्ष गोरे यांनी सांगितले.