खराबवाडीत तीन तास वाहतूक ठप्प
चाकण- तळेगाव-चाकण रस्त्यावर असलेल्या खराबवाडी (ता. खेड) येथे इंडियन ऑईल कंपनीचा एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर (एमएच 43 वाय 5257) उलटला. त्यामुळे गॅस गळती सुरु झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाल्याची घटना मंगळवारी (दि.24) पहाटे तीनच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त टँकर उरण येथून शिक्रापूर कडे निघाला होता. महामार्गावर मोठी वाहतूक असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गॅस गळती सुरु झाल्याने कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी वीज वितरणच्या मदतीने परिसरातील वीज पुरवठा खंडित करून या भागातील वाहतूक पूर्ण बंद करून विशेष दक्षता घेतली होती.
टँकरचालक गेला पळून
सकाळी सहा वाजेपर्यंत क्रेनच्या सहाय्याने सुरक्षितरित्या अपघातग्रस्त टँकर सरळ करून भोसे (ता. खेड) येथील प्रकल्पात नेण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. अपघातानंतर टँकरचालक घटना स्थळावरून पळून गेला. तळेगाव चाकण रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकार्यांना घटनास्थळी पोहचून पोलिसांच्या उपस्थितीत टँकरची तपासणी करून टँकर मधून सुरु असलेली गॅस गळती थांबवली. तीन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी सहाच्या सुमारास तीन क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर उभा करून भोसे येथील इंडियन ऑईलच्या प्रकल्पात नेण्यात आला. सकाळी आठ नंतर या भागातील वाहतूक आणि वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यात आला.