चाकरमान्यांची सुरत पॅसेंजर तीन तास आधी धावणार

0

10 जूनपासून अंमलबजावणी ; प्रवाशांमधून संताप ; लोकप्रतिनिधी बेदखल

भुसावळ- चाकरमान्यांची रेल्वे म्हणून ओळख असलेल्या भुसावळ-सुरत पॅसेंजरची वेळ बदलण्याचा घाट पश्‍चिम रेल्वेने घातल्यानंतर लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्‍वासन हवेत विरले असून 10 जून पासून ही गाडी आता नेहमीच्या वेळेपेक्षा तीन तास आधी धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांसह व्यापार्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दररोज रात्री 12.35 वाजता धावणारी सुरत पॅसेंजर आता 10 जून पासून दररोज रात्री 9.15 वाजता सोडण्यात येणार आहे. तीन तास आधी ही गाडी सुरत येथे पोहोचणार असली तरी या प्रकाराने मात्र प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

व्यापार्‍यांना सर्वाधिक फटका
कपड्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या सुरत शहरात खान्देशातील शेकडो व्यापारी दिवसभराचे काम आटोपून रात्रीच्या सुरत पॅसेंजरने प्रवास करतात. साधारण सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही गाडी सुरत येथे पोहचल्याने व्यापार्‍यांना या वेळेत मार्केट उघडे होत असल्याने सोयीचे होते. दिवसभरातील कामे आटोपून सायंकाळच्या व रात्रीच्या पॅसेंजरने व्यापारी खान्देशात पुन्हा परततात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला प्रघात पश्‍चिम रेल्वेने मोडला असून रेल्वे प्रवाशांसह व्यापारीवर्गातून मोठा संताप व्यक्त होत आहे.