आरोपींकडून दोन हजार 300 रुपयांच्या रोकडसह चाकू जप्त ; अन्य दोघा पसार आरोपींचा कसून शोध ; आरोपींना न्यायालयाने सुनावली कोठडी
भुसावळ- अप 11062 दरभंगा-एलटीटी (पवन) एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातील प्रवाशांना चाकूच्या धाकावर मारहाण करीत लूट करणार्या चार दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात मनमाड येथील सतर्क रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन हजार 300 रुपयांच्या रोकडसह लुटीतील चाकू जप्त करण्यात आला आहे तर आरोपींचे दोन साथीदार पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. दरम्यान, अटकेतील चौघे आरोपी जळगाव जिल्ह्यातील असून ते जळगाव स्थानकावरून इंजिनानंतरच्या सर्वसाधारण डब्यात चढल्याची माहिती पुढे आली आहे. मनमाड लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करून तो शून्य क्रमांकाने भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला तर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
चाकूच्या धाकावर प्रवाशांना लुटले
अप पवन एक्स्प्रेसने चाळीसगाव सोडल्यानंतर मनमाडजवळील पानेवाडी स्थानक आल्यानंतर चौघा आरोपींनी चाकूच्या धाकावर प्रवाशांना मारहाण करीत पैशांची मागणी सुरू केल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. याबाबतची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाल्याने डीएसी अजयकुमार दुबे यांनी कारवाईबाबत सूचना केल्यानंतर मनमाड लोहमार्गसह रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांनी धाव घेतली. आरोपींनी पळण्यासाठी धोक्याची साखळी ओढली मात्र त्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणेने संबंधित रेल्वेच्या जनरल डब्याला सुरक्षा कडे केल्याने चौघा आरोपींच्या मुसक्या आवळता आल्या तर अन्य दोन संशयीत मात्र पसार होण्यात यशस्वी झाले.
या आरोपींना यंत्रणेने केली अटक
गोपाल नाना शेवरे (21, वडाळा, ता.चाळीसगाव), अंकुश अनिल पवार (23, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, ता.भुसावळ), संजय अरुण बोरसे (22, किनगाव, ता.यावल), आकाश सारेश शेवरे (20, वडाळा, ता.चाळीसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून दोन हजार 300 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. जळगाव स्थानकावरून रात्री 9.45 वाजता आरोपी सर्वसाधारण डब्यात चढत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. मनमाड लोहमार्ग पोलिसात संजय रामलखन ठाकूर (26, समस्तीपूर, बिहार) यांच्या फिर्यादीवररून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व तो अधिक तपासासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.