मुक्ताईनगर न्यायालयाचा निकाल ; आरोपीला सुनावला तीन हजारांचा दंड
मुक्ताईनगर- थुंकल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एकास चाकू मारण्यात आला होता. या प्रकरणी मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर आरोपीस दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व तीन हजारांचा दंड सुनावण्यात आला. तालुक्यातील मानेगाव येथील विजय मधुकर कोळी हा संदीप सुभाष सपकाळेसमोर थुंकला होता तर या घटनेचे वाईट वाटून विजय कोळीने संदीपला शिविगाळ करून त्याच्या पोटात चाकु मारून दुखापत केल्याची घटना 2013 मध्ये घडली होती. या प्रकरणी विजय कोळीविरुद्ध गुन्हा दाखल होता. न्यायालयात दाखल फौजदारी खटल्यात आरोपी विजय कोळीविरूद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने न्या.संजीव सरदार यांनी आरोपीस दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा, तीन हजारांचा दंड व पिडीतास 15 हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश गुरूवारी दिला. या खटल्यात सरकारी वकील निलेश जाधव यांनी आठ साक्षीदार तपासले. पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नरसिंग चव्हाण, रवींद्र सपकाळे यांनी काम पाहिले.