चाचण्यांचा खर्च कोटींच्या घरात!

0

मुंबई । प्रपत्रिकांचे झेरॉक्स वाटण्याचे प्रकार, पेपरफुटी अशा कारणाने नेहमी चर्चेत असलेल्या संकलित आणि पायाभूत चाचण्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने गेल्या शैक्षणिक वर्षात कोट्यवधींचा खर्च केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून इयत्ता दुसरी ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतली जाते. या चाचणीच्या प्रश्‍नपत्रिका महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडून उपलब्ध करून दिल्या जातात. परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या पायाभूत गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने सदर परीक्षा घेतली जाते. या परीक्षांसाठी कोट्यवधींचा खर्च आल्याची माहिती विद्या प्राधिकरणाने अरविंद नाईक यांना माहिती अधिकारातून दिली आहे.

प्रश्‍नपत्रिका वितरित करण्यासाठी खर्च जास्त
पायाभूत चाचणीचे मराठी, गणित, इंग्रजी आणि विज्ञान हे पेपर होतात. छपाई करून सर्व विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका वितरित करण्याचा खर्च कोटींच्या घरात आहे. 2015-16 या शैक्षणिक वर्षात संकलित मूल्यमापन चाचणीच्या छपाईसाठी 2 कोटी 91 लाख 80 हजार 171 रुपये खर्च केला आहे, तर पायाभूत चाचणीसाठी 2 कोटी 57 लाख 93 हजार 378 रुपये खर्च केला असून, एकूण तब्बल 5 कोटी 49 लाख 73 हजार 549 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. संकलित मूल्यमापन 1 चाचणीसाठी 3 कोटी 42 लाख 50 हजार 645 खर्च केला आहे, तर प्रश्‍नपत्रिका वितरित करण्यासाठी 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी 16 लाख 45 हजार 414 रुपये, तर पायाभूत चाचणीसाठी 2016-17 या शैक्षणिक वर्षात 2 लाख 93 हजार रुपये वाहतुकीसाठी खर्च केला आहे, तर मूल्यमापन चाचण्यांसाठी 31 लाख 36 हजार 805 इतका खर्च करण्यात आल्याचीही माहिती आरटीआयमधून देण्यात आली आहे.