चानूने विश्‍वविक्रमासह जिंकले सुवर्णपदक

0

गोल्डकोस्ट । मागील काही वर्षांपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा दबादबा वाढला आहे. या लौकीकाला जागत भारताने स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच रौप्यपदकासह पदकांचे खाते खोलले. पुरुषांच्या वेटलिफ्टींग क्रीडा प्रकारातील 56 किलो गटात पी गुरुराजाने भारताला हे पदक मिळवून दिले. तर अन्य लढतींमध्ये जागतिक सुवर्णपदक विजेती मीराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेमध्येही सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. वेटलिफ्टींग 48 किलो वजनी गटामध्ये चानूने 196 किलो वजन उचलून राष्ट्रकुलमध्ये विक्रम रचत सुवर्ण पदक पटकावले आहे. तिनही प्रयत्नात तिने आपल्यापेक्षा दुप्पट 80 किलो, 84 किलो आणि 86 किलो वजन उचलले. यानंतर क्लीन अँड जर्कमध्येही आपल्या शरीराच्या दुप्पट वजन उचलले. तीन यशस्वी प्रयत्नात अनुक्रमे 103 किलो, 107 किलो आणि 110 किलो वजन उचलून ओव्हरऑल विक्रम आपल्यानावे केला. चानूने ग्लास्गोमध्ये झालेल्या गेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले होते. तेव्हा तिने एकूण 196 किलो (86 आणि 110 किलो) वजन उचलले होते.

या स्पर्धेमध्ये मॉरिशियसच्या मेरी हनिता रोली रानाओसोवाने 170 किलो वजन उचलत रौप्य तर श्रीलंकेच्या दिमुशा गोम्सने 155 किलो वजन उचलून कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेमध्ये सुरुवातीपासून चानूने वर्चस्व पाहायला मिळाले. मणिपूरच्या चानूने 2014 ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. गतवर्षी जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवताना तिने स्नॅचमध्ये 85 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 109 किलो असे एकूण 194 किलो वजन उचलले होते. आपला हाच विक्रम चानूने मोडीत काढला. तिची ही आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. 28 वर्षीय गुरुराजा यांने 249 किलो वजन उचलत भारताच्या खात्यात पहिले पदक जमा केले आहे.मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद यांने 261 किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले तर श्रीलंकेच्या अशून चतुरंगा लकमल यांने 248 किलो वजन उचलत कांस्य पदकाची कमाई केली.

हॉकीत पराभवाने सुरुवात
भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गोल्ड कोस्ट सेंटरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेल्सने भारताला 3-2 असे पराभूत केले. हॉकी इतिहासातील वेल्सने भारतावर मिळवलेला हा पहिला विजय आहे. भारतीय संघाला या सामन्यात 15 पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यापैकी केवळ एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला यश आले.

बॅडमिंटनमध्ये विजयी सलामी
भारतीय बॅडमिंटन संघाने विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाने मिश्र बॅडमिंटन प्रकारात श्रीलंकेचा 5-0 ने पराभव केला. श्रीकांत आणि सायना नेहवालच्या कामगिरीच्या जोरावर भारताने हा एकहाती विजय मिळवला. चार सुपर सीरिज विजेत्या श्रीकांतने पुरुषांच्या एकेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या निलूका करुणारत्नेचा 21-16, 21-10 असा सरळ गेममध्ये पराभव केला. तर लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने महिला एकेरीच्या सामन्यात मदुशिका दिलरुक्षी बेरुवेलजवर 21-8, 21-4 अशी मात केली. महिला दुहेरीच्या सामन्यात भारताच्या अश्‍विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी जोडीने 21-12, 21-14 अशी मात केली. यासोबतच भारतीय संघाने 5-0 अशी क्लीन स्वीप लंकेला दिली. या विजयानंतर भारताने अन्य लढतीत पाकिस्तानलाही धुळ चारली.

इतर निकाल
महाराष्ट्राचा वीरधवल खाडे 50 मी. बटरफ्लाय प्रकारात उपांत्य फेरीत धडक
स्क्वॅश- हरिंदरपाल सिंह विजयी, 11-3, 11-13, 11-6, 11-8 च्या फरकाने कॅमरुन स्टॅफर्डवर मात
टेबल टेनिस – भारताच्या सत्यन गणशेखरन आणि हरमीत देसाईचा दुसर्‍या फेरीत प्रवेश, त्रिनिनाद टोबॅगोच्या प्रतिस्पर्ध्यांला केले पराभूत