विद्यार्थ्यांची अभिवादन फेरी व पोवाडा गायन
चिंचवड : क्रांतिवीर चापेकर बंधूचा 119 वा स्मृतिदिन समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-लेझीम, झांज पथकांच्या जयघोषात रथामध्ये दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हरी चापेकर बंधू, महादेव रानडे, छत्रपती शिवाजी महाराज व मोरया गोसावी यांची वेशभूषा केलेले विद्यार्थ्यांची अभिवादन फेरी काढण्यात आली. तसेच यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. क्रांतीवीर चापेकर वाड्यात बुधवारी झालेल्या कार्यक्रमाला स्वा. सावरकर साहित्याच्या अभ्यासक गीता उपासनी, पद्मश्री पुरस्कारप्राप्त मुरलीकांत पेटकर, चापेकर समितीचे अध्यक्ष गिरिश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, सहकार्यवाह रवींद्र नामदे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य गतीराम भोईर, मधुसूदन जाधव, अशोक पारखी, लक्ष्मण पवार, आसाराम कसबे, नितीन बारणे, शरद जाधव, नीता मोहिते, विश्वस्त विलास लांडगे, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, डॉ. रंजना नवले, बिभीषण चौधरी, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, दिगंबर हुचगावकर, घाट चित्रपटाचे दिग्दर्शक राज गोरडे, प्रा. दिंगबर ढोकले हे उपस्थित होते.
दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हरी चापेकर, महादेव रानडे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. खिंवसरा पाटील शिक्षण संकुलातील विद्यार्थी आर्यन हंकारे व त्याच्या सहकार्यांनी ‘वंदन चापेकर बंधूंना’ हा पोवाडा सादर केला.
आपल्याकडून राष्ट्रपुरूषांचा उपमर्द
उपासनी म्हणाल्या की, प्रत्येकाने मनात काहीतरी संकल्प करावा. तो संकल्प पूर्ण करण्याची क्षमता वेदस्तुतीतील श्लोकात आहे. आपल्या राष्ट्रवीरांच्या, युगपुरुषांच्या बलिदानाची फार मोठी किंमत आहे. या राष्ट्रपुरुषांचा ब्रिटिशांबरोबर आपण भारतीयांनीच जो उपमर्द केला हे मोठे दुर्दैव असून ते पाप धुवून काढण्याचे काम क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती करीत असल्याचे समाधान वाटत आहे. देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेतली पहिजे. चापेकर समितीचे अध्यक्ष प्रभुणे म्हणाले की, 1972 साली स्थापन झालेल्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्यावतीने लवकरच राष्ट्रीय स्मारकाची सहा मजली इमारत उभी करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या स्मारकासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली आहे.
सायंकाळी पाच वाजता पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या प्रांगणातील क्रांतिवीर दामोदर चापेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन फेरीची सुरुवात झाली. चिंचवड चौकातील चापेकर बंधूंच्या समुशिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन फेरी चापेकर वाड्यात सायंकाळी सहा वाजता पोहचली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सदस्या प्रा. नीता मोहिते यांनी केले. माजी शिक्षण सभापती व क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य अशोक पारखी यांनी उपस्थितांचे आभार मानले. पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या कल्पना बिचुकले, सोनाली शिंदे या विद्यार्थीनींच्या वंदेमातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.