यावल- शहरातील निलेश मोतीराम खाचणे या तरूणाची ओएलएक्सवर चारचाकी वाहन विक्रीच्या जाहिरातीत फसवणूक झाल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणाने मारोती 800 ( एम. एच.02 पी.ए. 6518) या वाहनाची जाहिरात पाहिली होती तेव्हा या वाहन विक्रीची माहिती टाकणार्या पुणे येथील जतिंदर सुरिंदरकुमार सहानी (एस.नं.256 सई अपार्टमेंट फ्लॅट नं.2, वडगाव ग्रीन थिंग हॉटेलच्या मागे) यांच्याशी त्यांनी संपर्क साधला व वाहन संदर्भात अधिक माहिती मिळवत 40 हजारात खरेदीचे ठरले. तेव्हा सहानी यांनी त्यांच्या स्टेट बँकेतील खात्याची माहिती खाचणे यांना दिली व पैसे खात्यावर टाकण्याचे सांगत पैसे मिळाल्यावर वाहन यावलला पाठवुन देतो, असे सांगितले. तेव्हा 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर या चार दिवसाच्या कालावधीत त्यांनी सहानी यांना तब्बल 36 हजार रूपये बँकेच्या खात्यात टाकून दिलेे मात्र तेव्हापासून आजवर सहानी यांनी वाहन पाठवले नाही व सतत टाळाटाळ केली. गेल्या आठ महिन्यांपासून होत असलेल्या टाळाटाळमुळे खाचणे यांना आपली फसवणूक झाल्याचे निर्दशनास आले. गुरूवारी त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठत सहानीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहेत.