इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या जंजाळात रोज नवी नवी उपकरणे दाखल होत असतात. सध्या मोबाईल चार्जिंग किंवा इतर उपकरणे चार्ज करणे हा फारच त्रासदायक विषय झाला आहे. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. ते काही खोटं नाही. पाण्याच्या प्रवाहाचा वापर करून रुपांतर विद्युत उर्जेत करणाऱ्या जनरेटरच्या शोधामुळे उपकरणे चार्ज करण्यासाठी लागणारी वीज घरच्या घरी तयार करता येणार आहे.
एस्ट्रीम नावाचं एक उपकरण पाण्याचा वापर करून वीज निर्माण करते आणि ही उर्जा मोबाईल चार्ज करण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. दक्षिण कोरियातील एनर्जी नोमेड कंपनीने बाटलीच्या आकाराचे हे यंत्र तयार केलं आहे. त्याच वजन ९०० ग्रॅम इतकं आहे.
या यंत्रात टर्बाइन पंखे फिरतात ते वाहत्या पाण्याच्या योगे. ही गतीज उर्जा विद्युत उर्जा निर्माण करते. एस्ट्रीम जनरेटरमध्ये असलेल्या ६४०० एमएच लिथियम बॅटऱ्या साडेचार तासात चार्ज होतात. त्याला असलेल्या पोर्टच्या आधारे मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू चार्ज होतात. प्रकाश मिळवण्यासाठीही एस्ट्रीम उपयोगी आहे.
सूर्यप्रकाश नसला तरी चालेल पण प्रवाही पाणी असेल तरच हा जनरेटर चालतो. सध्या गोड्या पाण्यावरच त्याची चाचणी घेण्यात आलेली आहे. आता तो समुद्राच्या पाण्याचा उपयोग करून चालू शकतो का ही शक्यता पडताळून पाहिली जात आहे.