चार अधिष्ठातांची नियुक्ती

0

पुणे : राज्यातील 11 विद्यापीठांसाठी एकूण 32 विद्याशाखा अधिष्ठाता पदे निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला.

त्यामुळे आता लवकरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चार अधिष्ठातांची नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या महिन्यात राज्यातील एकूण 11 अकृषी विद्यापीठांपैकी 5 मोठ्या विद्यापीठांसाठी प्रत्येकी 4 तर उर्वरित 6 लहान विद्यापीठांसाठी प्रत्येकी 2 अशी एकूण 32 विद्याशाखा अधिष्ठाता पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्याबाबतचा शासन निर्णय संकेतस्थळावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 हा राज्यात 2017 पासून लागू करण्यात आला असून यानुसार विद्यापीठातील प्रत्येक विद्याशाखेसाठी अधिष्ठाता पदाची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. विद्यापीठातील अध्यापन व संशोधनाच्या दर्जासह त्या-त्या विद्याशाखेतील अध्यापकांचे प्रशिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी विद्यापीठ अधिष्ठाता हे पद महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यापीठ अधिष्ठाता पदांच्या निर्मितीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पदांच्या निर्मितीमुळे 4 कोटी 17 लाख रुपये वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली.