जळगाव – कारचा अपघात झाल्यामुळे तरुणाने चार जणांनी मारहाण करून कार लुटल्याचा बनाव केल्याचा उघड झाले आहे. दरम्यान ही कार पोलिसांनी म्हाडा कॉलनीतील नालातून ताब्यात घेतली आहे. दरम्यान या तरुणविरुध्द तक्रार दाखल करण्यासाठी न्यायालयात बी समरी दाखल करण्यात येणार असल्याचे तपासाधिकारी पीएसआय नाना सुर्यवंशी यांनी सांगितले.
शहरातील राधाकृष्ण नगरातील स्वप्नील नामदेव वाघ हे एमएच १९ सीके ७०३३ क्रमांकाच्या कारने सकाळी नेरी येथे ट्रीप घेवून गेले होते. ट्रीपचे पैसे भेटल्यानंतर सायंकाळी स्वप्नील जळगावी आला. शाहुनगरातील काकाकडे असलेल्या कार्यक्रमाला त्याने हजेरी लावली. त्यानंतर स्वप्नील घराकडे जातांना त्यांचा कारचा अपघात झाला. दरम्यान स्वप्नील याने पिंप्राळा रेल्वे गेटपासून काही अंतरावर असलेल्या नवसाच्या गणपती मंदिराजवळ चौघांनी कार समोर मोटारसायकल लावून मारहाण करीत मोबाईल, पैसे व कार लुटून नेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसर्या दिवशी सकाळी ही कार म्हाडा कॉलनीजवळील नाल्यात मिळून आली होती. दरम्यान पोलिसांनी दिवसभर स्वप्नील वाघ याची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, कारचा अपघात झाल्याने मारहाण करून कार लुटीचा बनाव केल्याची कबुली स्वप्नील वाघ याने पोलिसांना दिली आहे.