लोणावळा : लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेत शिकणार्या तरुण आणि तरुणीचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना सोमवारी लोणावळ्याजवळील आय.एन.एस.शिवाजी नजीकच्या डोंगरावर उघडकीस आली. माणुसकीच्या नावाला काळिमा फासणार्या या घटनेने संपूर्ण लोणावळा शहर हादरून गेले आहे. मात्र या घटनेला चार दिवस उलटूनही पोलिसांचा तपास जिथून सुरू केला अद्यापि तेथेच अडकला आहे.
डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचे शवविच्छेदनामध्ये स्पष्ट
सिंहगड महाविद्यालयात शिकणार्या सार्थक दिलीप वाघचौरे (वय – 22, रा. सोनगाव, ता. राहुरी, जि. नगर) आणि श्रृती संजय डुंबरे (वय – 21, रा. शासकीय विश्रामगृहाजवळ, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे) या दोन्ही तरुण आणि तरुणीचे मृतदेह विवस्त्र आणि छिन्नविछीन्न अवस्थेत सोमवारी आढळून आले होते. या दोघांच्याही डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदनामध्ये स्पष्ट झाले आहे. या दोघांचेही मृतदेह ज्या अवस्थेत आढळून आले होते ती अवस्था बघता मृत विद्यार्थिनीवर तिचा खून करण्यापूर्वी अतिप्रसंग झाला किंवा काय याबाबत साशंकता होती. मात्र शवविच्छेदन प्राथमिक अहवालामध्ये ही शंका खोटी ठरली आहे.
खून नक्की कोणत्या कारणासाठी झाले
दोन्ही मुला मुलीचे मोबाईल वगळता अंगावरील ऐवज, हातातील घड्याळ जसेच्या तसे सापडल्याने खून, चोरीसाठी झाले नाही हे ही स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता हे खून नक्की कोणत्या कारणासाठी झाले याचा तपास पोलिस करीत आहे. ऑनर किलिंगपासून एक तर्फी प्रेम, प्रेमाचा त्रिकोण अशा सर्व शक्यता पोलिस तपासून बघत आहे. अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारही या प्रकरणात तपासण्यात आले असून, प्रत्येक छोट्यातला छोटा धागा पकडण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.
दुहेरी खुनाच्या तपासासाठी 10 ते 12 अधिकारी नेतृत्वात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषणची आणि लोणावळा शहर पोलिस स्टेशनची एकूण आठ पथके रवाना करण्यात आली आहे. यासोबतच अधिक तपासासाठी सायबर सेलची ही मदत घेतली जात असल्याचे अधिक्षक सुवेज हक यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. त्याशिवाय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सुवेज हक यांनी घटनास्थळी घटनास्थळी भेट दिली. हे दोन्ही अधिकारी स्वतः या घटनेत लक्ष घालून आहेत. तर अप्पर पोलिस अधिक्षक राजकुमार शिंदे आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो.नि. राम जाधव हे स्वतः लोणावळ्यात ठाण मांडून बसले आहे. असे अतानाही मागील चार दिवसात या खुणा संबंधी पोलिसांच्या हाती काहीही धागे दोरे लागलेले नाहीत, आणि या खुनामागचे कारण काय हे ही अद्याप पुढे आले नाही.
सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कँडल मार्च
घटनेचा निषेध करण्यासाठी आणि सार्थक आणि श्रुती या दोघांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सिंहगड महाविद्यालयात शिकणार्या हजारो विद्यार्थ्यांनी सिंहगड महाविद्यालय ते लोणावळा शहर पोलिस स्टेशन असा कँडल मार्च काढला. तसेच या दुर्दैवी घटनेस जबाबदार असणार्या गुन्हेगारांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करून तसेच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून बळी गेलेल्या आपल्या मित्र आणि मैत्रिणीला न्याय द्यावा अशी मागणी केली. तर दुसरीकडे सोशल मीडियावरही या घटनेचे पडसाद दिसून येत आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर या घटनेच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आले.