यवत । सोलापूर महामार्गावर बोरीपार्धी (ता. दौंड) हद्दीतील चौफुला येथील मंथन स्पन पाईप दुकानामध्ये (दि. 4 डिसेंबर 2017) रोजी पाईप घेण्याचा बहाणा करून तीन दरोडेखोरांनी दुकान मालकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून 50 हजार रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल लुटल्याची घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने चार महिन्यात 4 जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाईलच्या दिशेने तपास केला असता या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत पोलिस आरोपीचा सामावेश असल्याने खळबळ उडाली आहे. अल्ताब पठाण (21 रा. जि. अ.नगर), आदित्य बेल्हेकर (24 रा. अ.नगर), महेश खोरे (26 रा. जि.नगर), विकास अडागळे (28 रा. ता. शिरूर) असे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दोन आरोपी अद्याप फरार
या गुन्ह्यात अटक आदित्य बेल्हेकर हे अहमदनगर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. या लुटीच्या घटनेत एकूण सहा आरोपींचा समावेश असून अद्याप दोन आरोपी फरारी आहेत. या लुटीप्रकरणी घनःश्याम भापकर (28, रा. ता. दौंड,) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मोबाईलमुळे आरोपी गजाआड
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असताना चोरीला गेलेले मोबाईल आरोपी महेश खोरे याच्याकडे असल्याचे तपासात उघड झाले होते. यानंतर आरोपी खोरेकडे चौकशी केली असता एकूण सहा आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा गुन्हा उघड करण्याकामी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश क्षीरसागर, दत्तात्रय गिरीमकर, पोपट गायकवाड, निलेश कदम, निलेश गायकवाड, महेश गायकवाड, राजु मोमीन यांनी मोलाची कामगिरी बजावली.