चार राज्यात अतिवृष्टीमुळे सव्वाशेहून अधिक जणांचा मृत्यू !

0

नवी दिल्ली: महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि केरळला मुसळधार पाऊस आणि पुराचा तडाखा बसला आहे. या राज्यांमध्ये १२५ हून अधिक जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात २७, गुजरातमध्ये २२, कर्नाटकमध्ये ३५ तर केरळमधील मृतांचा आकडा ५७ वर पोहोचला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रविवारी पूरग्रस्त बेळगावची हवाई पाहणी करणार आहेत. हवामान विभागाने दक्षिणेतील राज्यांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे लष्कराच्या बचाव पथकांना मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटकमध्ये आलेल्या पुरात मृतांची संख्या २४ वरून ३५ वर पोहोचलीय. हवामान विभागाने कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यावरील सात जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढच्या ४८ तासांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

केरळमधील मलप्पुरममध्ये शुक्रवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली आकडल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. यामुळे केरळमधील गेल्या तीन दिवसांतील मृतांचा आकडा ५७ वर गेला आहे. कोझीकोड येथे चार आणि थ्रीसूरमध्ये शनिवारी तिघांचा मत्यू झालाय. वायनाड जिल्ह्यात ९ आणि कवलापारा येथे ६ जणांचे मृतदेह आढळून आलेत. तर पुथुमला येथे नऊ जण अद्याप बेपत्ता आहेत.