चालकाविनाच पीएमपीएमएल बस सुसाट

0

पिंपरी-चिंचवड : भोसरी येथील बीआरटी बस थांब्यावर चालकाविनाच पीएमपीची बस उतारामुळे अचानक वेगात रस्त्यावर धावत जवळील फुटपाथवर चढली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. घटनेत एक व्यक्ती थोडक्यात बचावली असून यामध्ये दोन ते तीन दुचाक्यांचे नुकसान झाले. तसेच मोठी दुर्घटना टळली. मंगळवारी सकाळी पीएमपीची बस (एमएच12 केक्यू 0210) जुन्नर-नारायणगावला जाणार्‍या बसच्या समोर असलेल्या बीआरटी थांब्यावर थांबली होती. बसमध्ये चालक नव्हता. उतार असल्याने बस सुरू झाली आणि वेगात थेट जवळच्या फूटपाथवर चढली. परिणामी परिसरात एकच गोंधळ उडाला. सकाळची ही वेळ मोठ्या वर्दळीची असते. अनेक पथारीवाले दुकानांची मांडामांड करत असतात. बस अचानक येताना पाहून सगळ्यांनी एकच पळापळ केली. चपलांचे दुकान मांडणारा एकजण बस खाली येता-येता थोडक्यात बचावला. नागरिकांनी प्रसंगावधान राखत पळापळ केल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन-तीन दुचाक्यांचे नुकसान झाले.

प्रत्यक्षदर्शीं कुंदन डुंबरे यांच्या म्हणण्यानुसार, बस चालक गाडीला चावी लावून बाहेर निघून गेला होता. यावेळी गाडी न्यूट्रल स्थितीत होती. ज्या पद्धतीने गाडी अचानक धावायला सुरुवात झाली. त्याअर्थी चालकाने हॅण्डब्रेक लावला नसल्याचा अंदाज आहे. बस धावताना पाहून चालक व वाहकाचे लक्ष जाऊन त्यांनी फूटपाथाजवळ धाव घेत गाडीचा ताबा घेत गाडी थांबवली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.