चालक-वाहकांचा वसाहतीसाठी संघर्षाचा पवित्रा

1

बारामती । बारामती एसटी आगारातील चालक-वाहक वसाहत पाडण्याच्या नोटिसा मिळाल्यानंतर या संबंधित बातमी दैनिक जनशक्तिने (दि.29 नोव्हेंबर) प्रसिद्ध केल्यानंतर एकच खळबळ उडाली. सध्याच्या परिस्थितीत बत्तीस चालक-वाहक या इमारतीत राहतात. तर समोरची अधिकार्‍यांची निवासस्थाने बंद अवस्थेत आहेत. आपल्याला या वसाहतीतील घर खाली करावे लागत असल्यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणाचाच गंभीर प्रश्‍न या चालकवाहकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे चालक-वाहकांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुलांच्या परिक्षा संपेपर्यंत येथून बाहेर पडणार नाही त्यासाठी आम्ही संघर्ष करू अशा भावनाही या वसाहतीतील कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.
आम्ही ज्या परिस्थितीत ज्या अवस्थेत आम्ही जगत आहोत, आमच्या अत्यंत गैरसोयी असतानाही केवळ मुलांच्या शिक्षणासाठी येथे राहात आहोत. असेही या कुटुंबीयांंनी सांगितले. मूळ पगार वीस वर्षांच्या पुढे ज्यांची नोकरी झाली आहे. त्यांना दहा हजाराच्या आसपास आहे. यावर दहा टक्के घरभाडे भत्ता मिळतो म्हणजेच पर्यायाने एक हजाररुपये महिन्याला घरभाडे म्हणून मिळतात. एवढ्या घरभाडे भत्त्यात संपूर्ण बारामतीमध्ये एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातसुद्धा घर मिळू शकत नाही हे वास्तव आहे. मात्र एसटी महामंडळ चालक-वाहकांच्या दु:खावरच मीठ चोळत आहेत. बारामतीमध्ये सध्या कमीत कमी चार हजार रूपये एका फ्लॅटचे भाडे आहे त्यामुळे आमच्या एवढ्या छोट्या पगारात कसे घर भागवायचे हाच प्रश्‍न आमच्या समोर उभा आहे असेही या कुटुंबीयांनी सांगितले.
आम्हाला सेवा कर म्हणून 270 रुपये वजा केले जातात मात्र यात या वसाहतीत कोणतीही सेवा मिळत नाही. तीन वर्षापूर्वी तत्कालीन व्यवस्थापकांनी येथे स्वच्छतेसाठी येणार्‍या कर्मचार्‍याला बंद केले. तसेच पाणी सुविधेसाठी येणार्‍या कर्मचार्‍यासही बंद केले. एवढेच नव्हे तर या तत्कालीन व्यवस्थापकाने वाहक चालकांना आर्वाच्च्या भाषा वापरून ही वसाहतच पाडायला लावतो अशा प्रकारची धमकीच दिली होती. मात्र या व्यवस्थापकाचे राजकीय लागेबांधे असल्यामुळे व राजकीय प्रभावाखाली चालक वाहकांनी हा अन्याय सहन केला असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आमच्या पगारातून सेवाकर वजा केला जात असताना सुविधा न देता हा कर कशासाठी घेतला गेला. व या कराचे काय झाले? याविषयी आम्हाला काही सांगितले जात नाही. याउलट आम्हाला जितक्या जास्त गैरसोयी होतील हेच पाहिले जाते.