पिंपरी-चिंचवड : सिंधी बांधवांच्या चालिहो उत्सवाला सोमवारपासून शहरात भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. बाबा झुलेलाल मंदिरात 40 दिवसांसाठी ज्योत प्रज्वलित करुन ठेवण्यात आली आहे. सिंधी समाजाचे आराध्य दैवत बाबा झुलेलाल यांनी 1066 वर्षापूर्वी सिंधी समाज बांधवांना विश्वशांती, बंधुभाव यांचा संदेश दिला. सर्वधर्मांनी एकोप्याने या समाजात रहावे, सलोखा वाढावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची शिकवण बाबा झुलेलाल यांनी त्यावेळी दिली होती. चालिहो साहेब हा उत्सव सिंधी बांधव दरवर्षी चाळीस दिवस साजरा करतात.
40 दिवस उपवास
या चाळीस दिवसात उपवास केले जातात, त्याशिवाय या काळात आपण केलेल्या पापांची कबुलीही दिली जाते. या काळात मांसाहार मद्यप्राशन केले जात नाही. आज सिंधी बांधवांनी मोठ्या संख्येने बाबा झुलेलाल मंदिरात प्रज्वलित केलेल्या ज्योतीचे दर्शन घेतले. या चाळीस दिवसांच्या कालावधीत मंदिरात भजन, कीर्तन, पालव आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे याचा लाभ घ्यावा असे ट्रस्टच्यावतीने आवाहन केले आहे. बाबा छतुराम झुलेलाल मंदिर, मुख्य बाजार येथील मंदिराचे सचिव जवाहर कोटवानी, मास्टर बल्लूमल, लच्छु तुलसानी, प्रताप बजाज, भगवान खत्री, कुमार मोटवानी आदींनी संयोजन केले.