‘चालू खासदार नकोय आम्हाला’ ‘शिरुरची जनता वेडी नाही’

0

सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल

पिंपरी- शिरुर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे शिवाजी आढळराव-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यातच आता सामना रंगणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. कोल्हे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरच खर्‍या अर्थाने दोघांमध्ये शाब्दिक वार सुरु झाले. त्यातच कोल्हेंना उमेदवारी निश्‍चित झाल्याने शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोघांच्या समर्थकांतून एकमेकांवर समाज माध्यमात टीका-टिपण्णी होवू लागली आहे. त्यामुळे आढळराव आणि कोल्हे यांच्यात चांगलाच सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार हे विजयी चौकार मारण्यास सज्ज झाले आहेत. त्याकरिता आढळरावांनी नुकतीच किल्ले शिवनेरी ते शंभूतीर्थ वढू बुद्रुक विजय निर्धार यात्रा काढली. या यात्रेचा समारोप भोसरीत विजयी चौकार मेळावा घेवून केला. त्या मेळाव्यातून मी निधड्या छातीचा मराठा असल्याचे आर्वजून सांगितले.

फेसबुक पेजवरुन पोस्ट 
मी अनेकांना लोळवलं अशी खरमरीत टीका कोल्हेंवर त्यांनी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांनीही चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. त्याच्याच फेसबुक पेजवरुन पोस्ट लिहून ‘व्वा आढळराव’ यामधून ‘चालू खासदार नकोय आम्हाला’ झोपी गेलेला जागा झाला, अशा शब्दांत टीका केलीय.

खासदाराला घरी बसवाच 
मागील 15 वर्षात खासदार होतात, पण कधी शिवनेरी ते वढू रॅली यात्रा काढलेली आठवत नाही. असेल हिम्मत तर एकदा शिरुरच्या जनतेला एवढेच सांगा की, खासदार निधीतून शिवनेरी आणि वढू-तुळापूर येथे किती निधी दिला, संभाजी महाराजांच्या प्रेरणा स्थळाला किती निधी दिला. याचा लेखा-जोखा सांगून टाका. निवडणुका जवळ येताच. हे राजकारण करताय आपण, हे न समजायला शिरुरची जनता वेडी नाही. त्यानंतर जनताच ठरवेल, काय करायचे ते? त्यामुळे अशा चालू खासदाराला घरी बसवणारच ! अशा शब्दांत कोल्हेंनी खासदार आढळरावांचा समाचार घेतला आहे.