चाळीसगाव- येथील तेली समाजाचे माजी अध्यक्ष “तेली समाज भूषण ” तथा माजी नगराध्यक्ष मधूकर उखाजी चौधरी (वय ७१) यांचे चौधरी वाडा येथील राहत्या घरी काल सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. ते राष्ट्रवादी पक्षाचे माजी प्रांतिक सदस्य सदानंद चौधरी यांचे वडील तथा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांचे ते वडील बंधू होते.
यावेळी आमदार शिरीष दादा चौधरी, कोळी समाज प्रदेश अध्यक्ष आमदार रमेश कोळी, भाजपचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष आर.टी.चौधरी, माजी आमदार आर.ओ.पाटील, धुळ्याचे प्रथम महापौर भगवान करनकाळ, माजी नगराध्यक्ष जीवन चौधरी, जिल्हा परिषद सभापती पोपट भोळे, माजी आमदार राजीव देशमुख, साहेबराव घोडे, ईश्वर जाधव, तेली समाजाचे प्रांतिक कार्यकर्ते मनोहर शेठ शिंगारे, युवराज करनकाळ, जिल्हा परिषद राष्ट्रवादी गटनेते शशिकांत साळुंखे, व्यापारी आघाडीचे प्रदिप देशमुख, बेलगंगेचे संचालक दिलीप चौधरी, सचिव बापू चौधरी, नगरसेवक रामचंद्र जाधव, अर्जुन परदेशी आदी उपस्थित होते.
शून्यातून विश्व निर्मिती
स्व.मधुकर चौधरी यांनी सदानंद उद्योग समूहाच्या माध्यमातून शहरात हॉटेल व्यवसायात मोठी भरारी घेतली होती.हॉटेल सदानंद, सदानंद गार्डन, सदानंद गुजराथी थाळी, सदानंद परमिट रूम रेस्टॉरंट, सदानंद पॅलेस आदी नामवंत हॉटेल त्यांनी सुरु केल्या. जिल्ह्यात पहिला परमिट रूम म्हणून घाट रोड वरील हॉटेल ओळखले जात होते.
सर्वसमावेशक राजकारण !
स्व.मधुकर चौधरी यांनी गेले चाळीस वर्ष चौधरी वाडा या प्रभागाचे नेतृत्व केले हिंदू मुस्लिम समाजात बंधू भाव कायम रहावा यासाठी त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले . तेली समाजाचे कुशल संघटक करून त्यांनी अनेकांना प्रगतीपथावर नेले चाळीसगांव चे सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. त्यांनी सतत सात पंचवार्षिक चौधरी वाडा प्रभागाचे नेतृत्व केले यातून त्यांची लोकप्रियता सिद्ध होते ,चाळीसगांवचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द लक्षवेधी राहिली होती त्यांच्याच काळात उत्तर महाराष्ट्रात एकमेव असलेली आधूनिक स्मशानभूमी कार्यान्वीत झाली. आज या ठिकाणी अंतिम संस्कार होत असताना उपस्थितांनी कै. मधु अण्णा यांच्या कार्याची आठवण काढली .
पालिका राजकारणात ते आपल्या मर्जीतील जवळपास पाच सात नगरसेवक निवडून आणीत त्यामुळं त्यांच्या शिवाय पालिका राजकारणाची बेरीज वजाबाकी होत नव्हती. तीस वर्षे राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेचे ते संचालक होते , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पीपल्स बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. मितभाषी, अतिशय विनम्र, कुशल संघटक असलेले स्व. मधू अण्णा चौधरी यांचा दांडगा जनसंपर्क होता . सतत सामाजिक कामात व्यग्र असलेल्या मधू अण्णा चौधरी यांनी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तेली महासभेच्या कार्यकारिणी मध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला होता . त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांची नेहमी गर्दी राहत असे. पालिका राजकारणात मधु अण्णा नगराध्यक्ष होते तेव्हा राजीव देशमुख उपनगराध्यक्ष होते ही जोडी त्यावेळी चर्चिली गेली होती.आपल्या राजकीय जीवनात पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे चेअरमन लोकनेते कै. अनिल देशमुख यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात.