चाळीसगावातील कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचार्‍याच्या निधनाने हळहळ

0

तालुक्यावर शोककळा : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

चाळीसगांव- शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी बापूराव संभाजी पाटील (वय 35) यांचा कर्तव्य बजावत असतांना मृत्यू झाला. त्यांना मंगळवारी सायंकाळी 5. 30 वाजता शहरातील घाट रोड पोलिस चौकीच्या ठिकाणी नाकाबंदी सुरू असतांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. बापूराव पाटील हे मूळचे अमळनेर तालुक्यातील गांधली येथील रहिवासी होते. बापुराव पाटील यांच्या आई-वडीलांचे ते लहान असतांनाच निधन झाले असल्याने ते मामाच्या गांवी महाळपुर (बहादरपूर) येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आज त्यांच्यावर पारोळा तालुक्यातील महाळपुर (बहादरपूर) येथे दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. बापुराव पाटील यांनी सर्वप्रथम भारतीय सैन्य दलात 10 वर्षे देशाची सेवा केली त्यानंतर त्यांनी जळगांव येथे एलसीबी पथकात कार्यसेवा बजावली व नंतर चाळीसगांव येथे पोलीस खात्यात ते गेल्या 5 ते 6 वर्षापासून गुन्हा अन्वेषण पथकात कार्यरत होते. बापूराव पाटील यांनी चाळीसगांव तालुक्यात अल्पवधीच्या काळात त्यांनी शहरातील नागरीकांशी सखोल समन्वय ठेवला होता, त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्र परिवार देखील जमविला. त्यांच्या जाण्याने निश्चीत चाळीसगांव वासियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यविधीस चाळीसगांव शहर व तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पोलीस, महसुल खात्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच मित्र परिवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.