निकीता पाटील व महेश अहिरे प्रथम, धोंडीराम टकले द्वितीय, तर तेजस्विनी केंद्र तृतीय बक्षिसाची मानकरी
राज्यातील 58 संघांचा सहभाग: आठ तास चालली स्पर्धा
चाळीसगाव – येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगांव संचलीत नानासाहेब य.ना. चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्वस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत निकीता पाटील (पुणे) व महेश अहिरे (मालेगांव) यांना प्रथम क्रमांकास 11 हजार, द्वितीय बक्षिस म्हणून 7 हजार 500 रूपये धोंडीराम टकले तर तृतीय बक्षिस 5 हजार रूपये तेजस्विनी केंद्रे (औरंगाबाद) हिने पटकावले.
यावेळी उत्तेजनार्थ 1 हजाराचे रोख बक्षिस सोनल जाधव (अहमदनगर) व इरफान इक्बाल शेख यांनी मिळविले. बक्षिस वितरण प्रसिद्ध उद्योगपती मंगेश चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. रात्री 8 वाजता झालेल्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य तानसेन जगताप तर विचारमंचावर अरूण निकम, माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर, संस्थेचे संचालक वास्तू विद्या विशारद धनंजय चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, अविनाश देशमुख, रवी पाटील, सुधीर पाटील, माजी जि.प.सदस्य शेषराव पाटील, प्राचार्या साधना बारवकर, प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव, वंदना चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य तानसेन जगताप, कृषिभूषण अरुण निकम, उद्योजक मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात शिक्षणमहर्षी नानासाहेब य.ना. चव्हाण यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. प्रा. योगिता पाटील, समृध्दी सोलंकी व प्रा.गणेश पाटील यांनी परिक्षक म्हणुन काम पाहिले. प्रा.टी.एस. चव्हाण यांनी सुत्रसंचलन केले तर प्रा.मनोज शितोळे यांनी आभार व्यक्त केले. जेष्ठ पत्रकार मुकेश पवार यांचे स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले.
राज्यातील 58 संघाचे चार सहभाग
या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता डॉ. राहुल रनाळकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ रंगकर्मी शंभु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सुमारे 58 संघ राज्यभरातून स्पर्धेत सहभागी झाले होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निवृत्त मुख्याध्यापक एस. डी. पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर अरूण निकम, संजय पाटील, बी.व्ही. चव्हाण,धनंजय चव्हाण, सुधीर पाटील, आनंदा पाटील, अविनाश देशमुख, शेषराव पाटील, विश्वास चव्हाण, प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव, लक्ष्मण चव्हाण, प्रकाश देशमुख, नानासाहेब पाटील, प्राचार्या साधना बारवकर, प्राचार्य व्ही.जे. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.राहुल रनाळकर यांनी सांगीतले की, उत्कृष्ठ वक्ता होण्यासाठी विद्यार्थ्याने आधी उत्कृष्ठ वाचक झाले पाहिजे. तसेच, सोशल मिडीयाचा अती व गैरवापर विद्यार्थ्यांसाठी घातक आहे, चांगला विचार समाजापर्यंत पोहचवण्यासाठी वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन हे प्रभावी माध्यम होऊ शकत, असंही प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. ज्येष्ठ रंगकर्मी शंभु पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की आपल्या भाषणातुन वक्तृत्वातून सृजनशिल विचार सुचतात. विद्यार्थ्याने समाजात डोळस वृत्तीने वावरले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. ही स्पर्धा सुमारे आठ तास चालली. यात अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी सडेतोड मते मांडली.