चाळीसगाव: भाचीच्या लग्नासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून बेडरूम मधील लाकडी कपाटातून सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना शहरातील अयोध्या नगर येथे घडली असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिपक रावसाहेब जगताप (वय- ४७ रा. अयोध्या नगर ता. चाळीसगाव) हा वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून शहर वाहतूक शाखेत पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. धुळे येथे भाचीचा लग्न असल्याने २५ रोजी दुपारी १५:३० वाजता घराला कुलूप लावून दिपकने वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरू प्रेमसिंग उर्फ बबलू राजपूत यांच्याकडे चावी देऊन लग्नासाठी ते गेले होते. मात्र लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर २६ रोजी रात्री १९:३० वाजताच्या सुमारास हे दाम्पत्य घरी परतले. तेव्हा घराचे कुलूप हे भिंतीवर ठेवून दरवाजाच्या आतून कडी लावण्यात आलेली होती. दरम्यान दिपक यांनी दुसऱ्या ठिकाणाहून घरात जाऊन पाहणी केली असता बेडरूम मधील लाकडी कपाटातून २० हजार किंमतीची ५ ग्रॅमची बदामाची अंगठी, १६ हजार किंमतीचे ४ ग्रॅमचे कानातील टॉल्स, २० हजार किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे चैन व १ लाख ६८००० हजार रोकड असे एकूण २,२४००० हजार चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यावर दिपक याने भाडेकरू प्रेमसिंग उर्फ बबलू राजपूत यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे ऐकायला मिळाली. त्याच्यावरच संशय घेऊन दिपक याने लागलीच शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम-३८०,४५४, ४५७ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.