चाळीसगाव। शहरात सालाबादप्रमाणे यावर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती तालुका व शहरातील समाज बांधवांच्या वतीने एकत्रितपणे 14 रोजी साजरी केली जाणार असून सर्व गट -तट विसरता एकत्रित स्वाभिमानी जयंतीचे आयोजन चाळीसगाव येथील तरुण बौद्ध मंडळ, भीम नगर मित्र मंडळ, मातोश्री रमाबाई आंबेडकर, नगरस्टेशन विभाग यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जयंती दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन त्यांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उत्सव समितीचे रामचंद्र जाधव, रोशन जाधव, गौतम जाधव, संभा जाधव, किरण मोरे, किरण जाधव, शरद जाधव, मनोज जाधव, घमा जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते.
जयंतीनिमित्त तिन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन
13 ते 15 एप्रिलपर्यंत 126वी जयंती उत्सव साजरा होणार असून 13 रोजी रात्री 12 वाजता डॉ.आंबेडकर उद्यानात जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. 14 रोजी सकाळी 8:30 वाजता डॉ.आंबेडकर उद्यानापासून मोटारसायकल अभिवादन रॅली निघणार असून 14 रोजी सायंकाळी 6 वाजता रेल्वेस्टेशन बाहेर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणुक निघणार आहे. या मिरवणुकीत पहिल्यांदाच महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या साठी स्वतंत्र वाद्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई, सर्वांसाठी ठिकठिकाणी थंड पेयांची व्यवस्था करण्यात आली आहे. मिरवणुकीचा समारोप रात्री 9 वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ झाल्यानंतर रात्री 9 वाजता भीम स्वरांजली ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 7 ते 10 वाजता अन्नदानाचा वाटप होणार आहे. 15 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता आंबेडकर उद्यानात महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक राजू बागुल मुंबई व गायिका निशा भगत मुंबई यांच्या भीम गीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
शहरातील सर्वपक्षिय मिरवणूकीत भाग
गेल्या 5 वर्षापासून समाजातर्फे कुणाकडून ही देणगी पावती न घेता स्वाभिमानी भीम जयंती चाळीसगाव येथे साजरी केली जाते. मात्र यावर्षी आगळी वेगळी भीम जयंती साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले. पॉम्पलेटवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज यांचेसह थोर महापुरुषांचे फोटो घेण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त मान्यवरांचे फोटो न घेता आमदार, माजी आमदार सर्व समाज बांधव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेमी, बंधू, भगिनी, सर्व राजकीय पक्ष, संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, आजी माजी जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, रा.स.शी.प्र.मंडळ चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी, कृउबा समिती, विविध संस्थांचे पदाधिकारी संचालक मंडळ, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, शहर ग्रामीण पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, सर्व वकील, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, रेल्वे कर्मचारी वीज वितरणचे कर्मचारी, आदींना आमंत्रित करण्यात आले आहे.
सहभागी होण्याचे आवाहन
मागील काळात भीमाचा किल्ला जिमखाना व पंचम बहुद्देशीय संस्था दरम्यान झालेले गैरसमज मिटले असून या जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधव एकत्र येऊन हि जयंती तालुका व शहराच्या वतीने एकत्रित पणे साजरी केली जात असून या जयंती सोहळ्यात सर्व समाज बांधवानी सामील व्हावे, असे आवाहन रोशन जाधव, रामचंद्र जाधव, धर्मभूषण बागुल, कालिदास अहिरे, आनंद खरात, भाऊसाहेब पोळ, गौतम जाधव, वकील राहुल जाधव, किरण जाधव, संभा जाधव, बबलू जाधव, किरण मोरे, शाम जाधव, शरद जाधव, मनोज जाधव, घमा जाधव, दिनेश मोरे, गौतम झाल्टे, सागर जाधव, दादा निकम, निलेश निकम, प्रशांत जाधव, दीपक जाधव आदींनी केले आहे. यावेळी पत्रकार बांधव व आयोजकांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला