चाळीसगावात विकास शुक्ल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

0
चाळीसगाव प्रतिनिधी । गी द मोपासा या गेल्या शतकातील जगप्रसिद्ध फ्रेंच कथाकाराच्या सर्वश्रेष्ठ कथांचा येथील  विकास बळवंत शुक्ल यांनी अनुवाद केला असून याचे प्रकाश मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद जोशी यांची उपस्थिती होती.
अध्यक्ष स्थानी मसाप पुणेचे विभागीय सचिव प्राचार्य तानसेन जगताप होते. विशेष अतिथी म्हणून रोटरी प्रांतपाल राजीव शर्मा आणि इनरव्हील प्रांतपाल गौरी धोंड यांच्यासह प्रदीपदादा देशमुख, योगाचार्य चंद्रात्रे, आमदार उन्मेष पाटील आणि नगराध्यक्ष आशालता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ श्रीपाद जोशी यांनी विकास शुक्ल यांच्या भाषांतर कौशल्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली. जर पात्रांची आणि जागांची नावे फ्रेंच नसती तर या कथा भाषांतर नसून स्वतंत्र वाटाव्यात इतके हे पुस्तक अप्रतिम आणि निर्दोष आहे असे ते म्हणाले. मोपासा, सार्त्र, काफ्का, कामू या सर्व लेखकांनी जागतिक कथाविश्वाला मार्गदर्शन केले आहे आणि मराठी लेखकाला सुद्दा प्रभावित केले आहे असे ते म्हणाले. सरकारने अकॅडमी स्थापन करून जागतिक साहित्य मराठीत अनुवाद होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. म्हणजे विकास शुक्ल सारख्या लेखकांना स्वतः प्रकाशक होण्याची वेळ येणार नाही अशी त्यांनी मागणी केली.
रोटरी प्रांतपाल राजीव शर्मा आणि इनर व्हील प्रांतपाल गौरी धोंड तसेच आमदार उन्मेष पाटील यांनी शुक्ल यांना शुभेच्छा दिल्या. विकास शुक्ल यांची अमेरिका स्थित कन्या अनीका गोवंडे हिचा दूरध्वनी संदेश ऐकवण्यात आला. तो ऐकत असताना सारेच भावुक झाले.  याप्रसंगी या पुस्तकातील द वेडिंग गिफ्ट या कथेचे अभिवाचन माधुरी वैद्य-कुलकर्णी आणि डॉ करंबेळकर यांनी सादर करून कथेतील नाट्य जिवंत उभे केले. समारंभाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन समारंभाच्या आयोजक जुलेखा शुक्ल यांनी केले.