चाळीसगाव कार्यालयात महिती सहाय्यक मिळावा

0

चाळीसगाव । चाळीसगाव माहिती कार्यालयात माहिती सहाय्यक हे पद रिक्त असुन त्यामुळे पत्रकारांना महत्वाच्या शासकीय बातम्या व ईतर बातम्या मिळत नाही म्हणुन याठिकाणी कायमस्वरूपी माहिती सहाय्यक द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाच्या वतीने माहिती प्रशासन संचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई यांना तहसिलदार यांच्यामार्फत गुरूवार 7 सप्टेंबर 2017 रोजी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय नाशिक, जिल्हा माहिती अधिकारी जळगाव, आमदार उन्मेश पाटील चाळीसगाव यांना पाठवण्यात आल्या असुन निवेदनावर अध्यक्ष आर.डी.चौधरी, सचिव एम.बी.पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

चाळीसगाव तालुका जिल्ह्यात मोठा असुन येथे सर्वच विभागाचे शासकीय कार्यालये आहेत. मात्र येथील माहिती व जनसंपर्क कार्यालयात माहिती सहाय्यक पद हे रिक्त असुन त्याठिकाणी नियमित माहिती सहाय्यक नाही व तो कार्यभार मुख्य लिपीकाकडे असतो त्यांना नियमित जळगाव, धुळे येथे ईतर कामकाजासाठी बोलावले जाते. त्यामुळे शासकीय माहिती पत्रकांपर्यंत येत नाही व ती माहिती जनतेपर्यंत पोहचत नाही. तालुक्यात आमदार, खासदार हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने अनेक शासकीय कार्यक्रम सुरु असतात व मंत्री महोदयांचे धावते दौरे असतात मात्र ती माहिती स्थानिक वृत्तपत्र व जिल्हा दैनिकांच्या प्रतिनीधींना कळविणे कार्यालयाची जवाबदारी असतांना ती माहिती कळविली जात नाही, म्हणुन चाळीसगाव माहिती कार्यालयास नियमित माहिती सहाय्यक मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.