जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील आठ वर्षांच्या चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात नराधम आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाने सुनावली.
चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी दाखल होता गुन्हा
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी आठ वर्षाची चिमुकली ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 18 ऑक्टोबर रोजी चिमुकलीची आई, वडील व दोन भाऊ शेतात कापूस वेचण्यासाठी त्यावेळी घरी चिमुकली व तिचा लहान भाऊ घरी होते. आरोपी गोरख उर्फ बापु भिमराव सोनवणे (22, चाळीसगाव तालुका) याने चिमुकली एकटी घरी असतांना दुचाकीवर घेवून जावून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तिला मारहाण करून परत घरी सोडून दिले. चिमुकलीची आई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. पिडीत मुलीच्या आईने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याप्रकरणी गोरख उर्फ बापू भीमराव सोनवणे (22) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नऊ साक्षीदारांची तपासणी
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत म्हणून गोरख सोनवणे याला अटक करण्यात आली. या खटल्याचे कामकाज अतिरीक्त सत्र न्या.डी.एन.खडसे यांच्या न्यायालयात चालविण्यात आाला. यात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडीत मुलगी, तिची आई, पंच साक्षीदार, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी आणि तपासाधिकारी एपीआय भामरे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. यात गोरख सोनवणे याला दोषी ठरवत विविध कलमांन्वये मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे निलेश चौधरी यांनी कामकाज केले. केस वॉच दिलीप सत्रे तर पैरवी अधिकारी म्हणून देविदास कोळी यांनी सहकार्य केले.