चाळीसगाव तालुक्यात गावठी दारुभट्ट्या उध्वस्त

0

मेहुणबारे, चाळीसगाव ग्रामीण व एलसीबी पोलीसांची धडक कारवाई

चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील विवीध गावांमध्ये गावठी दारुच्या भट्ट्या चाळीसगाव ग्रामीण पोलीस, मेहुणबारे व एलसीबी पथकाने उध्वस्त केल्या असुन रविवारी 14 ऑक्टोबर 2018 रोजी एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनिल कुऱ्हाडे व पथकाने तालुक्यातील हातले व सायगाव येथे दारुच्या भट्ट्या उध्वस्त केल्या तर मेहुणबारे व ग्रामीण पोलीसांनी दोन ठिकाणी भट्ट्या उध्वस्त केल्या असुन सततच्या कारवाई मुळे अवैध व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पहिली कारवाई
चाळीसगाव तालुक्यातील हातले येथे गावठी दारु तयार करण्याची भट्टी उध्वस्त केली त्यात कच्चे पक्के नवसागर गुळ मिश्रीत रसायन, उकळते रसायन व तयार १४० लिटर दारु असा एकुण ४२ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेवुन गावठी दारु तयार करण्याचे साहीत्य व रसायन जागेवर नाश करुन आरोपी बापु सुकदेव भोई रा. घाटरोड चाळीसगाव यास ताब्यात घेवुन रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई
दुसरा छापा तालुक्यातील सायगाव शिवारात हॉटेल रोहीत समोर नाल्यामध्ये सुरु असलेल्या गावठी दारुच्या हात भट्टीवर सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास छापा मारला त्याठिकाणी गावठी दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे १०० लिटर नवसागर गुळ मिश्रीत कच्चे पक्के रसायन २० लिटर चा एक कॅन, १०० लिटरची एक व २०० लिटरच्या ६ टाक्या ६०० रुपये किमतीची १५ लिटर तयार गावठी दारु हस्तगत करुन दारु तयार करण्याचे साहित्य व रसायन जागेवर नाश करण्यात येवुन आरोपी राकेश विजय दळवी (२४) रा सायगाव ता चाळीसगाव यास ताब्यात घेतले.

तिसरी कारवाई
तालुक्यातील वाघळी येथील तितुर नदीच्या पात्रात गावठी दारुच्या भट्टीवर छापा मारुन गावठी दारु तयार करण्याचे नवसागर, गुळ मिश्रीत कच्चे पक्के रसायन, उकळते रसायन तसेच ४० लिटर तयार दारु हस्तगत करुन जागेवर नाश करण्यात आले व सकाळी ९ वाजता तितुर नदीपात्रात छापा मारुन गावठी दारु तयार करण्याचे कच्चे पक्के रसायन व तयार दारु असा एकुण १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दारु तयार करण्याचे साहीत्य व रसायन जागेवर नाश करण्यात आले.