प्रवाशांचे हाल : शिरूड स्थानकानजीक रेल्वेतर्फे तांत्रिक कामे
भुसावळ- अल्प प्रवासी भाड्यात चालणारी धुळे-चाळीसगाव पॅसेंजरची एक फेरी 10 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान रेल्वे विभागाने शिरूड स्थानकानजीक तांत्रिक कामे करण्यासाठी रद्द केली आहे. ही फेरी रद्द झाल्याने चाळीसगाव व धुळे येथील प्रवाशांचे पहिल्याच दिवशी मोठे हाल झाले आहे. धुळे ते शिरूड रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळ देखभाल दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. धुळे रेल्वे स्थानकावरून दररोज सकाळी 11.40 वाजता सुटणारीव चाळीसगाव येथून पुन्हा दुपारी 1. 40 वाजता सुटणारी फेरी बंद करण्यात आली आहे. प्रवाशीभाडे कमी असल्याने मोठ्या संख्येने चाळीसगाव व धुळे येथील प्रवाशी या पॅसेजरने प्रवास करतात. ऐन दुपारच्या व गर्दीच्या वेळेतील फेरी बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.