चाकरमान्यांसह प्रवाशांचे होणार हाल ; जामदा सेक्शनमधील कामांसाठी ब्लॉक
भुसावळ- भुसावळ विभागातील चाळीसगावसह जामदा सेक्शनमध्ये पीक्यूआरएस इंजिनिअरींग ब्लॉक कामामुळे अप-डाऊन धुळे-चाळीसगाव पॅसेंजर तब्बल 16 दिवसांसाठी रद्द करण्यात आली असून या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. गाडी क्रमांक 51114 ही दररोज सकाळी 11.40 वाजता धुळे येथून सुटून चाळीसगाव येथे दुपारी 12.55 वाजता पोहोचते तर गाडी क्रमांक 51115 ही दुपारी 1.40 वाजता धुळ्याहून सुटल्यानंतर दुपारी 2.55 वाजता चाळीसगावात पोहोचते. या दोन्ही गाड्या तांत्रिक कामे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या असून या निर्णयामुळे चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे शिवाय कमी भाड्यात प्रवास शक्य असल्याने दररोज या गाडीला मोठी गर्दीही असते मात्र तब्बल 16 दिवस पॅसेंजर रद्द झाल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांसह बसेसचा आधार घ्यावा लागणार आहे. 7 ते 22 डिसेंबर दरम्यान गाडी क्रमांक 51114 च 51115 रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
9 रोजी हुतात्मा एक्स्प्रेसही रद्द
मुंबई रेल्वे विभागामध्ये 9 डिसेंबर रोजी पॉवर इंजिनिअरींग ब्लॉक असल्याने गाडी क्रमांक 11025 आणि 11026 अप- डाऊन भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.